मुंबई - तौक्ते वादळ मुंबई शहराच्या दक्षिणेला १५० किमी आत अरबी समुद्रात घोंगावत आहे. त्याच्या परिणामामुळे मुंबईसह उपनगरात जोरदार वार्यासह मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या बऱ्याच भागात चक्रीवादळाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. तौक्तेच्या प्रभावमुळे जोरदार वारे वाहत असल्याने शहरात आतापर्यंत एकूण १८२ झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
१८२ ठिकाणी झाडे पडली -
काल पासून गेल्या २४ तासात सकाळी ८ वाई पर्यंत शहरात २२, पूर्व उपनगरात ७ व पश्चिम उपनगरात २१ अशा एकूण ५० ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. तर आज सकाळी १७ मे रोजी सकाळी ८ ते १० या २ तासांच्या कालावधीत शहरात ५९, पूर्व उपनगरात १५ व पश्चिम उपनगरात ५८ अशा एकूण १३२ अशी एकूण १८२ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी पडताळणीकरिता व त्वरीत कार्यवाही करण्याकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. झाडे पडल्याने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
किनारपट्टी भागात मदतीसाठी एनडीआरएफ टीम दाखल-
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या बऱ्याच भागात चक्रीवादळाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. सध्या शहर उपनगरात जोरदार वारे वाहत आहेत, तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईत ठीक ठिकाणी तात्पुरती निवारा घरे बांधली गेली आहेत. संरक्षणासाठी एनडीआरएफचे 3 आणि अग्निशमन दलाचे 6 पथक तैनात केले आहेत.