मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आतापर्यंत दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी दिली. तसेच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आज पुन्हा चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
- सोमवारनंतर कठोर कारवाई - परब
आम्हाला कामावर यायचे आहे. पण काही लोक येऊ देत नाहीत असे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी कामावर यायला तयार आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेऊ, असे परब म्हणाले. तसेच सोमवारनंतर कठोर कारवाई होऊ शकते. सोमवारी निलंबित कर्मचाऱ्यांनी कामावर यावे. तसेच निलंबित न झालेल्या कर्मचाऱ्यांनीही कामावर यावे. मला संधी दिली नाही असे वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत, असे परब म्हणाले.
- तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय -
कर्मचाऱ्यांना अडवले तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावे. अशांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल. तसेच तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी कामावर आले नाही तर त्याहूनही कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.