मुंबई - लोकल रेल्वेवर दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहेत. आज वाशी ते मानखुर्द दरम्यान हार्बर मार्गावर वाशी खाडी पुलाजवळ अज्ञात समाजकंटकाने धावत्या लोकलवर दगड फेकला. यावेळी हा दगड लोकलमधील प्रवाशांना न लागता तो लोकलच्या गार्डला लागला. राजेश यादव असे या गार्डचे नाव असून या घटनेत ते जखमी झाले आहेत.
घटनेनंतर राजेश यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती कळवली. यानंतर ही लोकल मानखुर्द रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली आणि त्यांना आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा बल) साहाय्याने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून लोकलवर दगडफेकीचा घटना वाढत असताना रेल्वेच्या सुरक्षेविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. या अज्ञात समाजकंटकांना रेल्वे प्रशासनाने जर पायबंद घातला नाही. तर मात्र एखाद्या वेळेस प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी विक्रोळी फाटक येथे रेल्वे पोलिसांकडून दगड फेक करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, तरीही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अशा माथेफिरू लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी भावना सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.