मुंबई - सोमावरी सकाळपासून शहरासह उपनगरात बरसत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली होती. 2 दिवस पाण्यात गेलेली मुंबई आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.
मुंबईत साचलेले पाणी ओसरले असून बेस्टचे काही मार्ग वळवण्यात आले आहेत. तर मध्य आणि हार्बर रेल्वे सेवाही सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मुंबईत बुधवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत कुलाबा येथे २२९ तर सांताक्रूझ येथे 65 मिलिमीटर पाऊस पडला. शहराच्या विविध विभागात मुसळधार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता, परेल, माटुंगा किंग सर्कल, वडाळा बीपीटी कॉलनी, भायखळा, मस्जिद बंदर आदी ठिकाणी पाणी साचले होते.
मुंबईतील सखल भागासह उच्चभ्रू वस्ती असलेल्या मंत्रालय, पेडर रोड आदी विभागातही पाणी साचले होते. बाबूलनाथ, गिरगाव चौपाटी, खेतवाडी, नायर हॉस्पिटल, पोस्टल कॉलनी चेंबूर, गोवंडी आदी ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. मस्जिद बंदर येथे रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली. पाण्यात उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमधून २९० प्रवाशांना आरपीएफ पोलीस आणि एनडीआरएफ यांनी बाहेर काढले.
पावसामुळे साचलेले पाणी सध्या ओसरले असून मुंबई पूर्वपदावर येत आहे. पाणी उपसणाऱ्या पंपाच्या मदतीने पावसाचे पाणी काढण्यात येत आहे. माटुंगा गांधी मार्केट, शेल कॉलनी चेंबूर, मुंबई सेंट्रल, गोल देऊळ, नायर हॉस्पिटल, संत रोहिदास चौक येथील वाहतूक वळवण्यात आली आहे. तर काल सायंकाळपासून बंद असलेली मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
मुंबई मध्ये बुधवारी सकाळी ८.३० ते रात्री ११.३० पर्यंत कुलाबा येथे ३२८ मिमी पावसाची नोंद झाली, हा ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे. तसंच गेल्या ४६ वर्षांतील हा विक्रम असल्याचे वेधशाळेकडून सांगाण्यात येत आहे.