मुंबई - मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा जोरदार पावसाला पूर्व उपनगरात सुरुवात झालेली आहे. यामुळेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. एलबीएस मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनांच्या मोठमोठ्या रांगा येथे लागलेल्या आहेत.
पाण्यात वाहनचालकांना रस्ता काढावा लागतो
सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे यामुळे सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. भांडुप येथील भांडुप गाव आणि एलबीएस मार्गावरची दोन फुटापेक्षा जास्त पाणी भरले आहे. या पाण्यात वाहनचालकांना रस्ता काढावा लागतो आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक दुचाकीमध्ये पाणी गेल्याने, दुचाकीस्वार गाडी ढकलताना दिसत आहेत. त्याबरोबरच ही स्थिती कायम राहिल्यास मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होऊ शकते.
चोवीस तासांसाठी रेड अलर्ट
हवामान खात्या पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पाणी साचले होते. यामुळे रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. मध्य रेल्वेची सेवा सध्या वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, ही स्थिती कायम राहिल्यास पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.