मुंबई - राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या 8 डिसेंबरला शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला आहे. मात्र भारत बंदमध्ये काही व्यापारी संघटना सहभागी होणार नसल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले आहे. एफआरटीडब्ल्यूएने महाराष्ट्रात बंद पुकारलेला नाही, असे ते म्हणाले.
दुकान बंद ठेवणे हा प्रत्येक व्यक्तीचा ऐच्छिक निर्णय आहे. आम्ही यापुढे कोणत्याही व्यवसायाच्या नुकसानास समर्थन देत नाही, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह म्हणाले.
नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. भारत बंदमध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही सहभागी होणार आहे. भारत बंदला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे.
शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे.