मुंबई - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. सध्या महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज राज्यात कोरोनाचे आणखी 15 रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 89 वर पोहचली आहे. तसेच आज मुंबईत कोरोनामुळे आणखी एका 68 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीनवर पोहचली आहे.
राज्यात कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. रोज नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या रविवारी 74 होती. आता आणखी 15 रुग्ण आढळल्याने ही संख्या 89वर गेली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. सर्व रेल्वे, एसटी बस, खासगी बस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लोकांनी स्वयंशिस्त पाळून शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.