मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन 1 जूनला सकाळी संपणार आहे. मात्र लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तरी लॉकडाऊनच्या नियमात काही शिथिलता आणण्याची शक्यता सरकारमधील काही मंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
अद्याप राज्यातले 18 जिल्हे हे रेड झोनमध्ये
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेचा प्रभाव पहिल्या कोरोना लाटेपेक्षा अधिक आहे. या लाटेचा प्रभाव लक्षात घेता, राज्य सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊन घोषित करूनही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवून 1 जूनच्या सकाळी सात वाजे पर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णाची संख्या काही जिल्ह्यात कमी होत असली, तरी राज्यातले 18 जिल्हे हे रेड झोन मध्ये आहेत. म्हणजेच 18 जिल्ह्यात अद्याप रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.
राज्याच्या टास्क फोर्स सोबत चर्चा करूनच निर्णय - टोपे
उद्या होणाऱ्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत 1 जूननंतर लॉकडाऊन वाढवण्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. मात्र तत्पूर्वी राज्यातील लॉकडाऊन वाढवला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या सोबतच रेड झोनमध्ये असलेल्या 18 जिल्हे वगळता नागरिकांना काही दिलासा देण्यासाठी उर्वरीर महाराष्ट्रात काही नियम शिथिल केलं जाऊ शकतात का? याबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच मुंबई लोकल बाबत अद्याप कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. उर्वरित महाराष्ट्रात काही शिथिलता द्यायची झाल्यास, या बाबत राज्याच्या टास्क फोर्स सोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे हे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मात्र सध्या राज्याच्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता अंशीतचं नियम शिथिल केले जातील अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. व्यापारी वर्गाची अडचण लक्षात घेता व्यापाऱ्यांना दुकाने उघडी ठेवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी वाढवून दिला जाणार असल्याची शक्यता आहे.
सुत्रांकडून दिलेल्या माहिती प्रमाणे टप्याटप्याने लॉकडाऊन उघडला जाईल-
1 जूननंतर पहिला टप्यात व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल. दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल. सध्या सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंतचं दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रेड झोन मधील 18 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात जिल्हा बंदी उठवली जाऊ शकते
त्यानंतर दुसऱ्या टप्पात दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल. मात्र यात ही वेळ निर्धारित करून दिली जाईल.
लग्नसोहळ्यासाठी शिथिलता
लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची अट शिथिल करून 50 लोकांपर्यंत केला जाऊ शकतो. मात्र रेड झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांना यातून वगळण्याचा येईल. तिसरा टप्पात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्स आणि बारला ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल. चौथा टप्पात मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. जिल्हा बंदीबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहून टप्याटप्याने या प्रकारे शिथिलता आणली जाऊ शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात अनलॉक करण्यात आले. त्यानंतर राज्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे यावेळी राज्यात अनलॉक करताना कोणतीही ढिलाई राज्यसरकारकडून करण्यात येणार नाही असे संकते देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकल प्रवास, अंतरराजिय प्रवास यावर बंधने लवकर उठवण्यात येणार नाही.