मुंबई - जन्मतः श्रवणदोष असल्यास बाळाच्या एकुणच व्यक्तिमत्त्व विकासावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, नवजात बाळांची जन्मल्यापासून ७२ तासांच्या आत व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रवण चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच बाळाच्या वयाच्या ३ वर्षांपर्यंत वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार वेळच्यावेळी श्रवण चाचणी करणे गरजेचे आहे. ही चाचणी पालिका रुग्णालयांमध्ये मोफत केली जाते याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालिका रुग्णालयात चाचणी मोफत -
- जन्मजात श्रवण दोष असल्यास त्याच्या प्रतिकूल परिणामांचा प्रभाव आयुष्यभर राहू शकतो. ज्यामुळे संबंधीत कुटुंबाला व आप्तांना देखील विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जन्मलेल्या प्रत्येक बाळाची चाचणी ही वेळच्या वेळी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आवर्जून नमूद केले आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही चाचणी मोफत उपलब्ध आहे, असेही त्यांनी आंतरराष्ट्रीय श्रवण दिनाच्या निमित्ताने नमूद केले आहे. एक हजारांपैकी ४ बाळांमध्ये श्रवणदोष असल्याची माहिती आहे.
- साधारणपणे जन्मणाऱ्या प्रत्येक एक हजार मुलांमागे ४ बाळांमध्ये श्रवणदोष आढळून येतो. हा श्रवणदोष जेवढ्या लवकर लक्षात येईल, तेवढे त्यावर अधिक परिणामकारक उपचार करणे शक्य होते.
- साधारणपणे बाळ जन्मल्यापासून ७२ तासांच्या आत पहिली श्रवण चाचणी करणे गरजेचे आहे.
- श्रवणदोषांचे निदान वयाच्या तिसर्या वर्षापर्यंत झाल्यास वैद्यकीय उपचारांद्वारे जन्मजात श्रवण दोषांवर काही प्रमाणात यशस्वी उपचार करणे शक्य होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी व वेळच्यावेळी श्रवण तज्ज्ञांकडून श्रवण चाचणी करवून घ्यावी.
- श्रवण दोषांचे वेळच्यावेळी निदान झाल्यास वैद्यकीय उपचारांद्वारे त्याचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. ज्यामुळे भाषिक कौशल्य शिकण्यासाठी बाळाला लाभ होऊन त्याची संवाद क्षमता विकसित होण्यास मदत होऊ शकते. पर्यायाने व्यक्तिमत्व विकास साधला जाऊ शकतो.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे श्रवण चाचणी करण्यास केवळ पाच मिनिटांचा कालावधी लागतो. या चाचणीला शास्त्रीय भाषेत 'ओ. ए. ई.' (Ota-Acoustic Emission Test) चाचणी असे म्हणतात. ही'सिंपल एण्ड नॉन इनव्हेज़िव्ह' चाचणी आहे.
- या चाचणीत बाळ उत्तीर्ण झाले नाही, तरीही लगेचच श्रवणदोष असल्याचे निदान केले जात नाही. तर १५ दिवसांनी आणखी एकदा सदर चाचणी केली जाते. गरज भासल्यास 'ए. ए. बी.आर' (Automated Auditory Brainstem Response) ही चाचणीही केली जाते.
- लहान बाळांची श्रवण चाचणी महापालिकेच्य प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांमध्ये मोफत केली जाते. यामध्ये प्रामुख्याने परळ परिसरातील केईएम रुग्णालय, मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय, शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय आणि जुहू विलेपार्ले परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर कूपर रुग्णालय या रुग्णालयांचा समावेश आहे.
- लहान बाळांचे लसीकरण वेळच्यावेळी व नियमितपणे केल्यास लहान बालकांमधील संभाव्य बहिरेपणा १९ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
- लहान बाळांना कर्णकर्कश आवाज असलेल्या किंवा गोंधळ असलेल्या परिसरात घेऊन जाणे टाळावे.
- श्रवणदोष व श्रवण विषयक प्रतिबंधात्मक उपाय योजना याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ३ मार्च हा दिवस 'जागतिक श्रवण दिन' (International Hearing Day) म्हणून पाळण्यात येतो. दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा दिवस पाळण्यात येतो. यानुसार यंदाच्या म्हणजेच सन २०२२ करिता "आयुष्यभर ऐकू येण्यासाठी; काळजीपूर्वक ऐका" (To hear for life, listen with care) अशी मध्यवर्ती संकल्पना आहे.