मुंबई - मुंबईतील नद्यांमध्ये प्रदूषण होत आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला अनेकवेळा फटकारले आहे. त्यासाठी नद्यांचे सौंदर्यीकरण व सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दहिसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचे पुनरुज्जीविकरण केले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ हजार ३०४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करणार आहे. नदीच्या प्रदूषणाबाबत पालिकेने केलेले दुर्लक्ष व आता उशिराने आलेली जाग याबाबत विरोधकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
विरोधक प्रशासनाला धारेवर धरणार -
मुंबईतील नद्यांमध्ये होणारे प्रदूषणामुळे प्रदूषण मंडळ तसेच हरित लवादाने पालिकेला फटकारले आहे. काहीवेळा दंडही आकारला आहे. नद्यातील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा अशा सूचनाही देण्यात आल्या होत्य़ा. याकडे लक्ष वेधून अखेर महापालिकेने या दहिसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचे सौंदर्यीकरण व इतर उपाययोजना करून प्रदूषण रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ हजार ३०४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये, दहिसर नदीच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ३७६ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर वालभाट, ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ९२८ कोटी ४६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील दोन महत्वाचे प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. नदीच्या प्रदूषणाबाबत पालिकेने केलेले दुर्लक्ष व आता उशिराने आलेली जाग याबाबत विरोधकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : टीडीआरच्या बदल्यात पालिकेला मिळणार 4 हजार 108 घरे; पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
१ हजार ३०४ कोटींचा खर्च -
मुंबईतील पश्चिम उपनगरातील नॅशनल पार्क येथून दहिसर नदीचे उगम होऊन ती धोबीघाट, संजय नगर, लिंक रोड मार्गे मनोरी खाडीत विसर्जित होते. या नदीची लांबी १३ किमी आहे. या नदीच्या रुंदीकरण, संरक्षक भिंतीचे ९० टक्के काम तर पोच रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दरम्यान या नदीच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीमधून, सोसायटीमधून वाहून येणारे सांडपाणी, श्रीकृष्ण नगर व आंबेवाडी येथील तबेल्यातील शेणमिश्रित पाणी हे नदीत सोडले जाऊन नदी प्रदूषित झाली आहे. असाच काहीसा प्रकार वालभाट व ओशिवरा नदीबाबत घडत आहे. वालभाट नदी नॅशनल पार्क येथून उगम पावते व आरे कॉलनी, एसव्ही रोड, गोरेगाव मार्गे मालाड खाडीत विसर्जित होते. या नदीची लांबी ७.३१० किमी आहे. या तिन्ही नद्यांचे पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण करणे, प्रदूषण रोखणे आणि नदीत मिश्रित होणारे सांडपाणी रोखून त्यावर मलजल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा नदीत सोडणे आदी कामांसाठी पालिकेने टेंडर काढले होते. त्यानुसार, दहिसर नदीचे काम मे. एस.के. एस. पी. असोसिएट्स या कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका ३७६ कोटी ५ लाख रुपये कंत्राटदाराला मोजणार आहे. त्याचप्रमाणे, वालभाट व ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण करणे, प्रदूषण रोखणे आणि नदीत मिश्रित होणारे सांडपाणी रोखून त्यावर मलजल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा नदीत सोडणे आदी कामांसाठी शाहपूरजी पालनजी आणि कं. कोणार्क या कंत्राटदारांना पालिका १ हजार ३०४ कोटी ४६ लाख रुपये दिले जाणार आहे.
सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित -
वालभाट व ओशिवरा नदीत रिद्धी- सिद्धी नाला, बिंबिसार नगर नाला, नंदादीप नाला, नेस्को नाला, इंडियन ऑइल नाला, ज्ञानेश्वर नगर नाला इत्यादी नाल्यांचे व आजूबाजूच्या झोपडपट्ट्या, सोसायट्या येथील सांडपाणी मिश्रित होऊन नदीचे पाणी प्रदूषित झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.