मुंबई - कल्याण-डोंबिवलीमधील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे डोंबिवलीमधील नगरसेवक महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांचा समावेश असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आले. कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षांतराचा सोहळा मुंबईत पार पडला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास -
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी पक्षप्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते आपले सर्वस्व पणाला लाऊन काम करतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे मंत्री शिंदे म्हणाले.
हे होते उपस्थित -
माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे, मनसे पदाधिकारी सुभाष पाटील, रवी म्हात्रे, विजय बाकोडे, सुजित नलावडे, पंढरीनाथ म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, राजाराम म्हात्रे, देवा माने, मोहन पुंडलिक म्हात्रे, हनुमंत ठोंबरे, विक्की हिंगे, उज्ज्वला काळोखे आणि इतर कार्यकर्ते यांचा समावेश होता. कल्याण डोंबिवली मनपाच्या माजी महापौर विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, उप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेवक दिपेश म्हात्रे तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधातील 'ही' मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली; पुढील सुनावणी 20 डिसेंबरला