मुंबई - आम्ही हिंदू आहोत. म्हणाल तिथे देव आहे. मात्र, मंदिरांवर अवलंबून असणारी एक मोठी संख्या आहे. मोठे अर्थकारण आहे. हार, कुंकू विकणारा, मंदिरे स्वच्छ करणारा असा मोठा समाज यावर अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षात सरकारने त्यांच्यासाठी काय केले आहे. एका पैशाची मदत केलेली नाही. त्यांना असे झिडकारून टाकणे योग्य नाही. आम्ही आहोत तिथेच आमचा देव आहे. मात्र, या लोकांचा काहीतरी विचार करा. त्यांना काही तरी द्या. दारूची दुकाने सुरु ठेवता आणि मंदिरे बंद ठेवता ही सरकारच्या नीतीमध्ये चूक आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारच्या नीतीमध्ये चूक -
दगडातही आमचा देव आहे. ३६ कोटी देव आहेत. परंतु काही गरजु लोकांसाठी मंदिरे उघडायला हवेत. परंतु, मंदिरे बंद ठेवण्यामागचे कारण काही समजत नाही. जितकी गर्दी मॉल आणि बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टंसिंग पाळून मंदिरे सुरु करता येऊ शकतात. मंदिरे केवळ धार्मिक भावना म्हणून सूरु करून उपयोग नाही, अस फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्याबाबत ठोस निर्णय ते घेऊ शकलेले नाहित. तसेच, या सरकारच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह पालक नैराश्यात आहेत. असही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
'शाळा सुरू करण्याबाबत सरकार गोंधळात'
फेब्रुवारीच्या मध्यानंतर राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने, एप्रिल महिन्यात राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला. जुलै महिन्यात रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार दुकाने, कार्यालये, डान्स बार, रेस्टॉरंट, वाइन शॉप, मॉल आदी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे मंदिरे उघडावीत अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून केली जात आहे.
मंदिरे आणि शाळा उघडण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता
राज्यात गेले दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आला आहे. यामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. डान्स बार, रेस्टॉरंट, वाइन शॉप आदी बहुतेक दुकाने खुली झाली आहेत. मात्र, मंदिरे आणि शाळा अद्याप सुरु करण्याबाबत ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही. मंदिरे उघडण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात असून, आंदोलने करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी कालच कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याचे वक्तव्य केले आहे, यामुळे येत्या काही दिवसांत मंदिरे आणि शाळा उघडण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
'सरकार नेमकं कोणासाठी'
एकीकडे महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांपासून मंदिर बंद आहेत. तर डान्स बार, रेस्टॉरंट, वाइन शॉप सुरू आहेत त्यामुळे हे सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे? सरकारला सत्तेपोटी देव दैवतांचा विसर पडला आहे का असा सवाल विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. राज्यातील मंदिरे उडघण्याची मागणी सातत्याने सामान्य नागरिक करत आहेत. मात्र, सरकार मंदिर बंद करून बसली आहेत. यामुळे मंदीराबाहेर असणारे छोटे व्यवसाय बंद आहेत. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रात रेस्टॉरंट, डान्स बार, वाईन शॉप सुरू आहेत. धार्मिक स्थळ सर्व सामान्यांसाठी का उघडली जात नाहीत? याचे उत्तर राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला द्यावे असेही दरेकर म्हणाले आहेत.
'विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे आव्हान'
राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जात असल्याने, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार शून्यावर आला आहे त्याठिकाणी लवकरच शाळा सुरु केल्या जाऊ शकतात. मात्र, शाळेत जाणारे विद्यार्थी हे वयाने लहान आहेत. त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांना लस द्यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. लहान मुलांवर अद्याप लसीच्या परिणामांचा अभ्यास केला जात आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर लहान मुलांना लस दिली जाईल. एकीकडे लसीचा तुटवडा असताना लहान मुलांच्या लसीकरणाचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.
'कोविडची लाट संपलेली नाही'
राज्यातून कोविडची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलिकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे यश आहे. तसेच, आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविडयोद्धा होता आले नाही, तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
'निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष'
कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. माझे आपणास आवाहन आहे की, कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा. राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे. हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.