मुंबई - महापालिकेने वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर म्हणजेच घाटकोपर-मानखुर्द ( Theft At Ghatkoper Mankhurd Flyover ) जोडमार्गवर उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलांवरील सप्टेंबर २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२२ या ४ महिन्याच्या कालावधीत १ लाख ८३ हजार रुपये किमतींच्या वस्तुंची चोरी झाली आहे. त्याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये महापालिकेच्यावतीने सहायक अभियंता (पूल) ज्ञानेश्वर दगडू उकिर्डे यांनी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उड्डाणपुलावरील वस्तूंची चोरी -
वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) वर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले. हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०२१ पासून ८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत या पुलावरील लोखंडी दुभाजकाचे जवळपास २०० स्टड पोस्ट आतापर्यंत चोरीस गेले आहेत. प्रत्येक स्टड पोस्ट हे अडीच फूट उंचीचे आहे. त्याची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. यासोबत १२ इंच जाडीचे लोखंडी क्रॅश बॅरीअर (किंमत सुमारे ३० हजार रुपये), १२ मीटर लांब आणि १० इंच रुंदीचे लोखंडी हाईट बॅरीअर (किंमत सुमारे ३० हजार रुपये), सुमारे ३०० नग लोखंडी नटबोल्ट (किंमत सुमारे ३ हजार रुपये) इत्यादी विविध सुटे भागदेखील चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सूचना -
दरम्यान, या उड्डाणपुलावरील वाहनांची वर्दळ आणि सुट्या भागांची होत असलेली चोरी या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मुंबई पोलिस वाहतूक शाखेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीडोमीटर लावण्याची विनंती महानगरपालिका प्रशासनाने या पत्रांद्वारे पोलिसांकडे केली आहे.
हेही वाचा - Hijab Ban : 'पुढील निकाल येईपर्यंत हिजाबाचा आग्रह नको', सोमवारी होणार सुनावणी, न्यायालयाचे निर्देश