मुंबई - एनसीबीने मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या कार्डेलिया या क्रूझवर छापा टाकून शाहरूख खानच्या मुलासह अन्य दोघांना अटक केली होती. यात उद्योगपतीची मुलगी असलेल्या मूनमून धमेचा हिलाही अटक केली होती. ही मूनमून धामेचा कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तिची आणि शाहरूखचा मुलगा आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज याच्याशी तिचा संपर्क होता का? याचा तपास सुरू आहे. ती नेमकी पार्टीत कशी आली याचाही तपास केला जात आहे. याबाबत मूनमूनचे वकील अनिल सिंह यांनी कोर्टात स्पष्टीकरण दिले आहे.
एनसीबीने समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत शनिवारी या क्रूझवरील रेव्ह पार्टी उधळली होती
या पार्टीत सहभागी झालेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना सर्वात आधी अटक करण्यात आली. आता या हायप्रोफाइल पार्टीत सहभागी झालेली मूनमून धामेचा कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आर्यन आणि अरबाज यांच्या ती आधीपासून संपर्कात होती का? या पार्टीत तिची काय भूमिका होती? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मूनमूनचे वकील अनिल सिंह यांनी महत्त्वाचा तपशील आणि स्पष्टीकरणही दिले आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही मूनमून ओळखत नाही.
मुळची मध्य प्रदेशातील
मूनमून ही मुळची मध्य प्रदेशातील सागर येथील आहे. ती मॉडेलिंग आणि फ्रीलान्स अँकरिंग करते. ती दिल्लीत होती. परंतु, कोरोनाच्या काळात ती सागर येथे राहण्यास होती. नुकतीच ती कामाच्या निमित्ताने मुंबईत आली होती आणि तिला क्रूझवरील पार्टीच्या आयोजनकांनी आमंत्रित केले होते. असा दावा सिंह यांनी केला आहे.
मूनमूनचा ड्रग्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. तसा तिचा पूर्वेतिहास नाही. छापेमारीत तिच्याकडून कोणताही अमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला नाही. असेही वकिलांनी सांगितले आहे. मूनमूनकडे 5 ग्रॅम ड्रग्स मिळाल्याचे एनसीबीने म्हटले आहे. त्याबाबत विचारले असता त्यात तथ्य नसल्याचा दावा सिंह यांनी केला आहे.