मुंबई - मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिकेने 234 हॉटेल्स ताब्यात घेतले होते. या हॉटेल्सना तब्बल 41 कोटींची मालमत्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने सादर केला आहे. पालिका गरिबांना सुट देत नाही मात्र श्रीमंतांना सूट देते, असा आरोप विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केला आहे. तर याची सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
41 कोटींची मालमत्ता करात सुट
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात विषाणूची दुसरी लाट आली आहे. या लाटेत बाहेरच्या देशांतून मुंबईत येणाऱ्या नागरिकांना एअरपोर्टवरून थेट हॉटेलमध्ये क्वारंटाईनसाठी पाठवले जात होते. यासाठी पालिकेने 234 हॉटेल्स व मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या. त्याबदल्यात या 234 हॉटेल्स आणि मालमत्तांचा 41 कोटी 87 लाख रुपयांचा मालमत्ता कर माफ करावा, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. भायखळा येथील रिचडर्स अँड क्रुडास कंपनीतही पालिकेने विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. या कंपनीलाही मालमत्ता करात सुट दिली जाणार आहे. हा प्रस्ताव बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) पालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावात सविस्तर माहिती नसल्याने हा प्रस्ताव रोखण्यात आला आहे. या प्रस्तावावर सविस्तर माहिती आल्यावर त्यावर चर्चा करू व योग्य तो निर्णय घेऊ, असे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांनी सांगितले.
काँग्रेसचा विरोध
मुंबई महापालिकेने देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले होते. त्यासाठी प्रवाशांनी हॉटेलचे पैसे दिले आहेत. असे असताना पुन्हा त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देणे योग्य नाही. पालिका आणि सत्ताधारी श्रीमंतांना करामध्ये सूट देते मात्र मध्यमवर्गीय मुंबईकरांना मालमत्ता करामध्ये सूट देत नाही. हा प्रस्ताव आल्यास त्याला काँग्रेस विरोध करेल, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी संगीतले.
या आधीही देण्यात आली होती सूट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने संशयितांसह बाधितांच्या विलगीकरणासाठी हॉटेल्स ताब्यात घेतले होते. त्यासाठी यापूर्वीच त्यांना 20 कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. हा कर तेव्हा एकूण 180 हॉटेल्सना किंवा त्यांच्या मालमत्ता माफ करण्यात आला होता. तर,आता 234 हॉटेल्स व मालमत्तांना चार महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 41 कोटी 87 लाख रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. यात मुंबईतील सर्व पंचतारांकीत हॉटेल्ससह 233 हॉटेल्सना ही सुट मिळणार असून भायखळा येथील रिचडर्स अँड क्रुडास कंपनीतही पालिकेने विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. या कंपनीलाही मालमत्ता करात सुट दिली जाणार आहे.
हेही वाचा - कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना