मुंबई - केंद्र सरकार हे कोरोना या महामारीला रोखण्यात व लसीकरण अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी. या महामारीत पंतप्रधानांनी देशाला तीन 'ची' दिल्या आहेत. एक म्हणजे चीनचा डम्पिंग कचरा, दुसरा 'ची' म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला चिंता दिली. व तिसरे म्हणजे देशात सर्वत्र चीता दिल्या आहेत. अशी टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
लसीकरणाबाबत त्यांनी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे -
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेले एफिडेव्हिट हे लोकशाहीला मारक आहे. कोर्टाला काही समजत नाही असं त्यांना वाटते. कोरोनाच्या महामारीत देशाच्या आत्म्याला संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. संविधान न मानणारे हे सरकार आहे. मोफत लस देत असल्याचे एफिडेव्हिटमध्ये खोटे सांगितले आहे. काँग्रेसनं मागील काळात मोफत लसीकरण केले, पण कधी गाजावाजा केला नाही. लसीकरणाबाबत त्यांनी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे. असे यावेळी ते म्हणाले.
कोण झालंय जागतिक पप्पू -
ही राजकारणाची वेळ नाही. ही वेळ देशातील जनतेला वाचवण्याची आहे. जागतिक पातळीवरुन देशाच्या पंतप्रधानावर टिका होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर हास्यास्पद कोण झालंय ते बघा? आता त्यांना जागतिक पप्पू म्हणतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
त्यांनी लसीकरणाचा हिशोब द्यावा -
सेंट्रल व्हिस्टावर २० हजार कोटी खर्च करताय व लसीकरणावर मात्र केवळ ३५ हजार कोटी खर्च करताय. १७ कोटी लस खरंच देशात दिल्या गेल्या आहेत का ? याबाबत त्यांनी हिशोब द्यावा. सगळी माहिती देशातील जनतेला द्यावी. लसीकरण कसे करणार आहात, व लसी कश्याप्रकारे उपलब्ध करणार आहात. याबाबत सविस्तर केंद्राने जनतेला माहिती द्यावी. तसेच अजून किती दिवस काँग्रेस व गांधी घराण्यावर टीका करून राज्य करणार आहात? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा - धाकट्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या; तीन तासात अल्पवयीन मुलगा ताब्यात