पणजी - गोवा मुक्त झाल्यास यावर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशाचे राष्ट्रपती पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
जागविल्या जाणार स्मृती
राष्ट्रपतींच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू करण्यात आली आहे. 60वा मुक्तीदिन आणि राष्ट्रपतींची उपस्थिती ही गोमंतकीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावर्षीचा कार्यक्रम केवळ साजरीकरण नसेल तर मागील 60 वर्षांत आम्ही काय प्राप्त केले आणि विकासासाठी कोणत्या मार्गाने जावे लागेल, याचाही आढावा घेतला जाणार आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज ते प्रत्यक्ष मुक्ती गोवा मुक्तीसाठी आंदोलनाच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या असतील त्या स्थळांचा वारसा जपण्याबरोबरच स्मृती जागविल्या जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खाण प्रश्नावर सुनावणी
खाण प्रश्नावर सोमवारी सुनावणी होणार आहे. तेव्हा काय अपेक्षित आहे, असे विचारले असता डॉ. सावंत म्हणाले, आता लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. आम्ही 2027पर्यंत खाण सुरू ठेवाव्यात अशी, मागणी केली आहे. ज्यामुळे हा व्यवसाय सुरळीत होण्यास मदत होईल. न्यायालयात यावर युक्तीवाद करण्यासाठी सरकारबरोबर खाण कंपन्यांनीही आपल्या वकिलांशी चर्चा केली आहे.