मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणात ( Bulli Bai Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने ( Mumbai Cyber Police ) आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींची आज पोलिस कोठडी संपली आहे. त्यामुळे त्यांना आज बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या आरोपींची सायबर सेल पुन्हा कस्टडी मागणार काय, हे पहावे लागणार आहे. तसेच या प्रकरणातील पहिला आरोपी अटक करण्यात आलेला विशाल कुमारा झा याच्या जामीन अर्जावर ( Bail Application ) देखील बांद्रा कोर्टात सुनावणी होणार आहे.
बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपींना मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधून 7 जानेवारी रोजी मुंबईत आणले होते. त्यावेळी या आरोपी श्वेता सिंग, मयंक रावल यांना बांद्रा कोर्टात हजर केले असता आतापर्यंत या आरोपींना 8 दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. आज त्यांची पोलीस कस्टडी संपली असता त्यांना पुन्हा बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात बंगळूरूमधून अटक करण्यात आलेल्या विशाल कुमार झा यांनी कोर्टात जामीन अर्ज करता अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे विशाल कुमार झा याला जामीन मिळतो की नाही हे पाहावे लागणार आहे. 10 जानेवारी रोजी विशाल कुमार झा हा कोरोना पॉझिटिव्ह देखील आला होता. त्यानंतर त्याच्यावर न्यायालयात उपचार सुरू होते.
काय आहे 'बुली बाई' -
बुली बाई एक असं ॲप्लिकेशन आहे. जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 100 मुस्लिम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं या आरोपींविरोधात आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु केला होता.