मुंबई - काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी फोन करून कळवलं आहे की, त्यांना राज्यात परिवर्तन हवंय. त्यांना सेनेचे सरकार हवंय, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज व्यक्त केले. राऊत पुढे म्हणाले, की संपूर्ण महाराष्ट्राचीच अशी इच्छा आहे, यावेळी भाजपचा नाही, तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा.
भाजप मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नाही, ही त्यांच्या पक्षाची वैयक्तीक भूमीका आहे. उद्या १४५ आमदारांची यादी घेऊन सत्तास्थापनेसाठी भाजप राज्यपालांकडे गेले, तर त्यामध्ये आम्हाला दुःख व्हायची कोणतीही बाब नाही. ज्याच्याकडे बहुमत आहे, तो सरकार बनवेल आणि मुख्यमंत्रीपदही त्याच्याकडे राहील, त्याच्यात कोणी काय करू शकते? असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या तरुण फळीवर स्तुतीसुमने..
केवळ सत्तेत येण्यासाठी म्हणून काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देतंय का? असे विचारले असता, राऊत यांनी त्यास नकार दिला. राऊत पुढे म्हणाले, की काँग्रेसच्या आमदारांपैकी कितीतरी आमदार तरूण, उच्चशिक्षित आहेत. त्यांपैकी काही पहिल्यांदाच निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जाण असलेले हे आमदार आहेत. त्यांचा आवाज हा महाराष्ट्रातील तरुणाईचा आवाज आहे.
हेही वाचा : आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्यास पुरेसे सक्षम नाहीत - रामदास आठवले