मुंबई - खायच्या पानाला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्याकडे आदरातिथ्यासाठी देखील पान वापरलं जातं. पानाची सगळ्यात जास्त मागणी ही जेवल्यानंतर मुखशुद्धी म्हणून रात्री असते. या पानाच्या किमती साधारण तीस रुपयांपासून ते जास्तीत जास्त दोन ते तीन हजार पर्यंत असतात. पण, तुम्ही कधी एक लाखाचं पान ऐकलय का? कधी पाहिले का? नाही ना! तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक लाखाचं पान.
MBA चं शिक्षण करतोय पान व्यवसाय - एक लाखाच्या पाना प्रमाणेच या पान शॉपच्या मालकाची स्टोरी देखील तेवढीच इंटरेस्टिंग आहे. पान शॉपच्या मालकाचं नाव नशाद शेख आहे. नौशाद यांचे शिक्षण एमबीए झाले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी केली. पण, स्वतःचं काहीतरी सुरू करायचं या ध्येयाने झपाटलेल्या या व्यक्तीने आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेत त्याला एक रॉयल लुक दिला आणि आपल्या दुकानाच नाव दिलं 'द पान स्टोरी'. सध्या नवशाद एमबीएचे शिक्षण घेऊन एक लाखाचं पान विकत आहेत.

तंबाखू विरहित पान शॉप - नौशाद सांगतात, "पानाला आयुर्वेदात खूप महत्त्वाचं स्थान आहे. पण, सध्या पानात तंबाखू, किमाम यांसारख्या घटकाचा वापर वाढल्याने पानाची प्रतिमा डागाळली आहे. आज कोणीही पान खातं आणि रस्त्यावर थुंकत जातात. अशा लोकांमुळे परिसर अस्वच्छ होतो व रोगराई पसरते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आम्ही तंबाखू विरहित पान स्टोरीची सुरुवात केली. आमच्या दुकानात कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ मिळत नाहीत. 'स्वच्छ भारत स्वस्त भारत' हाच आमचा नारा आहे."

असं आहे 1 लाखांचं पान - मुंबईतील पान विक्रेते नौशाद शेख हे एक लाख रुपयांचे पान विकत आहेत. या पानाला 'फ्रेग्रन्स ऑफ लव्ह' म्हणजेच हनिमून पान असे नाव देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये राजा राणीची दोन पानं असतात. या पानांवरती सोन्याचा वर्क लावला जातो. सोबतच एक अप्रतिम अशी संगमरवरी ताजमहलाची प्रतिकृती देखील दिली जाते.

पानाचा इतिहास - खाण्याच्या पानाला एक प्रदीर्घ असा इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे पूजेमध्ये अथवा एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला औषध पानाच्या विड्या मधून दिली जात असत. बंगालमध्ये विवाह सोहळ्यात पानाला महत्त्वाचे स्थान आहे. कालांतराने पान हा शाही परिवाराचा एक हिस्सा बनला. मुघल काळात मुखशुद्धी म्हणून पानाचा वापर वाढू लागला. त्यानंतर हळूहळू पानाचे विविध प्रकार आले. आज चॉकलेट पान, फायर पान, आईस पान, स्मोक पान इथपर्यंत पानाचा प्रवास आहे. मुंबईतील माहीम दर्गा पासून अगदी जवळच द पान स्टोरी नावाने एक दुकान आहे. याच दुकानात तुम्हाला हे एक लाखाचं पान खायला मिळेल.