मुंबई - मुंबईमधील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यासाठी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने २०१७ ते २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत निर्बिजीकरणावर तब्बल ९ कोटींचा खर्च केला आहे. (Dog sterilization) या खर्चानंतर कुत्र्याची संख्या कमी न होता अडीच पटीने वाढली आहे.
कुत्र्यांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावा -
रस्त्यावरील भटके कुत्रे अंगावर येणे, भुंकने, चावा घेणे यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. (Mumbai Bmc Dog sterilization) या ज्वलंत विषयाला शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी, पालिका सभागृहात ६६ (क) नुसार वाचा फोडली होती. भटक्या कुत्र्यांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिकेने भटक्या जनावरांप्रमाणे भटक्या कुत्र्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवावे आणि त्यांना प्राणी मित्रांना सांभाळण्यासाठी दत्तक तत्त्वावर द्यावे, अशी मागणी पडवळ यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. यावर पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांनी आपला अभिप्राय दिला आहे.
कुत्र्यांची संख्या अडीचपटीने वाढली -
पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अभिप्रायानुसार (२०१४)मध्ये केलेल्या गणनेनुसार भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७२ होती. पालिकेने कुत्र्यांचा मृत्यू दर, प्रजनन दर, निर्बिजीकरण संख्या आदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतरही मुंबईतील कुत्र्यांची संख्या अंदाजे २ लाख ६४ हजार ६१९ वर गेली असल्याचे म्हटले आहे. २०१४ पासून आजपर्यंत पालिकेने अशासकीय संस्थांच्या माध्यमातून १ लाख २२ हजार ६४७ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. तसेच, २०१७ ते २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीत निर्बिजीकरणावर ९ कोटींचा खर्च केल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने एका कुत्र्याच्या निर्बीजीकरणावर सुमारे ७२८ रुपये खर्च केले आहेत.
११ व्हॅन व ३८ कर्मचारी -
पालिकेकडे भटक्या व उपद्रवी कुत्र्यांना पकडण्यासाठी सध्या ४ वाहने अधिक पालिका परिमंडळ निहाय प्रत्येकी एक याप्रमाणे अतिरिक्त ७ वाहने अशी एकूण ११ वाहने उपलब्ध आहेत. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ८ कनिष्ठ अवेक्षक, ६ श्वान पारधी दुय्यम निरीक्षक व २४ श्वान पारधी अशी ३८ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. तसेच, ६ अशासकीय संस्थांच्या मार्फत भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येते.
५ वर्षात निर्बीजीकरणावर केलेला खर्च -
२०१७ - १,४०,४१,६०० रुपये
२०१८ - २,७८,९२,८०० रुपये
२०१९ - १,८६,१८,६०० रुपये
२०२० - ३६,४३,२०० रुपये
२०२१ - २,५१,९१,३०० रुपये एकूण खर्च - ८,९३,८७,५०० रुपये...
हेही वाचा - Padma Awards 2022 : पद्म पुरस्कारांची घोषणा.. १२८ जणांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी..