मुंबई - राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी निश्चित झाला आहे. तब्बल दोन आठवडे अधिवेशन चालणार आहे. पहिला आठवडा ५ दिवसांचा तर दुसरा आठवडा ३ दिवसांचा असणार आहे. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण तर ८ मार्चला राज्याचा सन २०२१-२२चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. गुरुवारी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानमंडळाच्या प्रांगणात आज पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या कार्यक्रम जाहीर केल्याची माहिती, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.
विविध नेत्यांची उपस्थिती
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.
असा असेल आठवडा
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवसांचे असेल, यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कार्यक्रमावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. अधिवेशन कमी कालावधीचे असल्याने विरोधक नाराज आहेत. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर १ मार्चला राज्यपाल अभिभाषण होणार आहे. याच दिवशी पुरवणी मागण्यादेखील मांडल्या जातील. २ तारखेला राज्यपाल अभिभाषणावर चर्चा होईल. ३ आणि ४ तारखेला पुरवणी मागण्या मंजूर होतील आणि पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. ५ मार्चला विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि अशासकीय कामकाज असणार आहे. ८ तारखेला अर्थसंकल्प सादर केला जाईल. ९ आणि १० तारखेला चर्चा होऊन विनियोजन बिल पास होऊ आणि अधिवेशन समाप्त होईल, असेही परब यांनी सांगितले.
'तो वॉकआऊट अधिकृत नाही'
सल्लागार समितीच्या बैठकीतून विरोधकांनी वॉकआऊट केल्याचे म्हटले आहे. संसदीय मंत्री अनिल परब यांना विचारले असता, अध्यक्षांनी बैठक संपल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधकांनी वॉकआऊट केला. त्यामुळे तो वॉकआऊट अधिकृत म्हणता येणार नाही, असे सांगत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकली. दरम्यान, आम्ही १४ दिवसांचा कार्यक्रम दिला होता. मात्र, कोविडमुळे असा निर्णय घ्यावा लागेल, असे परब यांनी सांगितले.
अशी घेतली जाईल काळजी
कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, म्हणून विशेष खबरदारी घेतली जाईल. प्रत्येकाला आरटी-पीसीआर कोरोनाचाचणी सक्तीची असले. आठवड्याच्या शनिवार व रविवारी विधानभवनात कोरोना चाचणी होईल. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता विधान भवनात १ मार्चपासून निगेटिव्ह प्रेशर सिस्टीम कार्यान्वित केली जाईल. गर्दी होवू नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षारक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूत केली जाईल. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाईल. अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश नसेल. मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता सुनियोजित बैठक व्यवस्था केली जाईल. प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये सदस्यांची बैठक व्यवस्था असेल. सभागृहात यू. जी. यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटिंग प्रवेशद्वाराच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग यासारख्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रत्येक सदस्यांना एक किट दिले जाईल. यात एक फेसशिल्ड, मास्क, हॅडग्लोव्ह्ज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत.