मुंबई- मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने 'मिशन झिरो' राबवले आहे. 'चेज द व्हायरस', मिशन झिरो, ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रिटिंग या '४ टी' चतु:सूत्रीची अंलबजावणी सुरु केली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत अव्याहतपणे सुरु असलेल्या गृहभेटी, सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी यामुळे मुंबईमधील कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०२ दिवस इतका झाल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात आली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस आणि आजच्या २१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरुन ३१ दिवसांनी वाढून तो १०२ दिवस इतका झाला आहे. महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी ३ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक आहे. तर या व्यतिरिक्त ११ विभागांमध्ये सदर कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक असणा-या ३ विभागांमध्ये 'जी दक्षिण विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वाधिक असून तो १७५ दिवस इतका आहे. तर या खालोखाल 'इ' विभागात १६० दिवस, आणि एफ दक्षिण विभागात १५७ दिवस इतका आहे. या ३ विभागांव्यतिरिक्त इतर ११ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. या ११ विभागांमध्ये 'बी' विभागात १३७ दिवस, 'जी उत्तर' विभागात १३६ दिवस आणि 'एम पूर्व' व 'ए' विभागात १३५ दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे.
हेही वाचा-देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
मिशन झिरो आणि शीघ्रकृती कार्यक्रमांतर्गत फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेत आहेत. गरज असणाऱ्या भागांमध्ये २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 'कोविड १९' या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संपूर्ण राज्यभरात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राबविली जात आहे.
हेही वाचा-राज्यात ८ हजार १४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २१३ रुग्णांचा मृत्यू
सार्वजनिक परिसरात जे नागरिक 'विना मास्क' आढळून येतील त्यांच्यावर महापालिकेच्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई आवश्यक तेथे मुंबई पोलिसांच्या सहकार्याने देखील नियमितपणे केली जात आहे. यामुळे देखील कोविड संसर्गास आळा घालणे महापालिकेला शक्य होत आहे. त्याचबरोबर जे परिसर 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आले, त्याठिकाणी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच सर्वजणी शौचालयांचे निर्जंतुकिरण केले जात असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.
हेही वाचा-Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर..
मुंबईत कोरोनाचा प्रसार झाल्यापासून पालिका प्रशासन सतत हा प्रसार रोखण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सतत मुंबईमधील कोरोनाच्या परिस्थीतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देत आहेत. पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना मुंबईकरांची साथ मिळत असल्याने कोरोनाचा प्रसार कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईकरांनी आणखी काही काळ साथ दिल्यास कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.