मुंबई - महाराष्ट्र राज्यातील बाल मजूरीचे समूळ उच्चाटन करुन बाल कामगारांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने विविध विभागांमधील अधिकाऱ्यांसह बालकामगारांची मुक्तता व पुर्नवसन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकरिता एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. दरम्यान, बालकांना संरक्षण देवून बालकांचे भवितव्य आणि भविष्य घडविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.
सुधारित बाल कामगार कायद्यांचे कामगार विभागामार्फत सादरीकरण-
कामगार विभाग व चाईल्डलाईन इंडिया फाऊंन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सुधारित बाल कामगार कायद्यांचे कामगार विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. कामगार विभाग त्याचबरोबर महिला व बाल कल्याण विभाग, पोलीस विभाग व चाईल्डलाईन इंडिया फाऊंन्डेशन यांनी देखील त्यांच्यातर्फे बाल कामगारमुक्तता व पुर्नवसनाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचे सादरीकरण केले. यावेळी वेद - सिंगल बोलत होत्या.
बालकामगारमुक्त महाराष्ट्र' ही संकल्पना यशस्वी करण्याचे आवाहन-
ही कार्यशाळा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमांतून शासनाचे सर्व विभाग एकत्रितरित्या प्रभावीपणे काम करण्यासाठी निश्चित असे विचारमंथन होणार आहे. विभागीय स्तरावर अशाच कार्यशाळा आयोजित करुन सर्व संबंधित घटकांना या विषयाबद्दल संवेदनशील बनविण्यासाठी कामगार विभाग सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंगल यांनी दिली. बालकामगारांशी संबंधित असलेल्या सर्व शासकीय विभागांसह तसेच स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेवून सामूहिक प्रयत्न करून 'बालकामगारमुक्त महाराष्ट्र' ही संकल्पना यशस्वी करण्याचे आवाहन कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी केले. चाईल्डलाईन फाऊंडेशन संस्थेच्या समन्वयक चित्रलेखा आचार्य यांनी बालकामगार अथवा बालकांच्या कोणत्याही प्रश्नाबाबत त्यांची संस्था करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
बालकामगारमुक्त महाराष्ट्र संकल्पनेचे स्वागत करून त्यादृष्टीने सर्व विभाग कटिबद्ध-
बालकांसबंधी कोणतेही प्रश्न असल्यास १०९८ या हेल्पलाईनवर कधीही संपर्क साधू शकतात असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कामगार विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, चाईल्डलाईन इंडिया फाऊंन्डेशन या स्वयंसेवी संस्थेचे, कोकण विभागातील कार्यरत प्रतिनिधी व संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी बालकामगारमुक्त महाराष्ट्र संकल्पनेचे स्वागत करून त्यादृष्टीने सर्व विभाग कटिबद्ध राहतील अशी ग्वाही यावेळी दिली.
हेही वाचा- सेलिब्रिटी ट्विट प्रकरण : भाजप आयटी सेलप्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नावं समोर - गृहमंत्री