मुंबई - गोव्यातील एका बीचवर फिरायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरती 25 जुलै रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. मात्र या प्रकरणानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राज्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी देखील या वक्तव्याबाबत निषेध नोंदवला आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षा प्रदान करणे हे काम या राज्यातील सरकारचे आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले विधान हे दाखवून देते कि पुरुषसत्ताक व्यवस्था आजही आहे. महिला बाहेर पडली की तिच्यावर बलात्कारच होणार कुठेतरी असेच बोलण्याचा प्रयत्न त्यांच्या विधानातून होताना दिसत आहे. त्यामुळे या विधानाचा आम्ही निषेध नोंदवतो. त्यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
25 जुलै रोजी गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी सावंत यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या घटनेबद्दल मुलींच्या आई-वडिलांनाही दोष दिला होता. 'रात्री अपरात्री मुलींना बाहेर सोडताना आईवडिलांनी विचार करायला हवा. केवळ सरकार आणि पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. १४-१५ वर्षांच्या मुली रात्रभर बीचवर थांबत असतील तर पालकांनी विचार करण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांना बाहेर सोडताना पालकांनीही जबाबदारी घ्यावी,' असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. सावंत यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांची माफी मागावी
25 जुलै रोजी गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे की शासन, प्रशासन आणि सर्वचजण महिलांबाबत सुरक्षेतेची भावना निमार्ण करण्यासाठी कमी पडत आहे. त्या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले विधान हे तर पूर्णपणे निषेधार्थ आहे. मायबाप सरकारचे राज्यातील सर्वच महिला, युवती यांना सुरक्षा प्रदान करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था आजही आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. स्त्री बाहेर पडली की तिच्यावर बलात्कार होणार असं कुठे तरी बोलायचा प्रयत्न हा त्यांच्या विधानातून होताना दिसतो आहे. याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. त्यामुळे राज्यकर्ता म्हणून त्यांना हे शोभत नाही. त्यांनी देशातील सर्व महिलांची, मुलींची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी केली आहे.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे देखील आक्रमक
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सावंत यांच्या विरोधात थेट राष्ट्रीय महिला आयोग व राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडं तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.