मुंबई - मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यावेळी पालिका आयुक्तांनी मालमत्ता कर वाढीचे संकेत दिले होते. हा मालमत्ता कर ( Property tax hike Mumbai ) येत्या १ एप्रिलपासून वाढवला जाणार आहे. यामुळे कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या मुंबईकरांवर कराचा बोजा वाढणार आहे.
हेही वाचा - आजच्या कॅबिनेटमध्ये एसटी कामगारांच्या प्रश्नावर महत्वाचा निर्णय होणार - राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी
मालमत्ता कर वसुलीवर भर - मुंबई महापालिकेला जकात करातून सर्वाधिक महसूल मिळत होता. केंद्र सरकारने देशभरात जीएसटी कर लागू केल्याने जकात कर रद्द झाला. जकात कर रद्द झाल्याने त्या माध्यमातून पालिकेला मिळणारा महसूल बंद झाला. त्याबदल्यात सरकारकडून जीएसटीचा परतावा मिळू लागला. मात्र, हा परतावा कधीही बंद होऊ शकतो. यासाठी पालिकेने उत्पन्न वाढीसाठी नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार मालमत्ता कर वसुलीवर पालिकेने भर दिला आहे.
१ एप्रिलपासून मालमत्ता कर वाढणार - मालमत्ता करात दर पाच वर्षांनी 15 ते 16 टक्के वाढ अपेक्षित होती. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर नागरिकांवर कराचा बोजा वाढू नये यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ही करवाढ होऊ दिली नव्हती. पालिका आयुक्तांनी नुकताच 2022 - 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी मालमत्ता कर वाढवला जाईल, असे स्पष्ट केले होते. सन २०२२ - २३ या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिलपासून नवीन मालमत्ता कर वसुली करण्यात येणार असल्याने नवीन आर्थिक वर्षात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा पडणार आहे.
पालिकेचे आर्थिक गणित बिघडले - कोरोनामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे, २०२२ - २३ या आर्थिक वर्षात नवीन मालमत्ता कर वसुली करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. दरम्यान, ५०० चौरस फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. ५०० चौरस फुटांखालील १६ लाख घर मालकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे मुंबई महापालिकेला ३६४ कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे.
४ हजार ६०० कोटी मालमत्ता कर वसूल - २०२१ - २२ यात मालमत्ता कर वसुलीचे ६ हजार कोटींचे टार्गेट असून आतापर्यंत ४ हजार ६०० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. तर, मार्च अखेरपर्यंत ६ हजार कोटींचे टार्गेट पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेच्या कर संकलन निर्धारण विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.
हेही वाचा - New Corona Variant : डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला नव्या व्हायरसची एन्ट्री!