मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांनी रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे. मध्य रेल्वेकडून शनिवार- रविवारी मेगाब्लॉक घेऊन काम करण्यात येत आहे. आता त्यामध्ये रेल्वेकडून ७२ तासाचा सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ब्लॉक 5, 6 आणि 7 फेब्रुवारी असा असणार आहे. याबाबत अद्यापही रेल्वेकडून अधिकृत घोषणा केलेली नाही आहे.
सर्वात मोठा मेगाब्लॉक -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२ (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचा समावेश आहे. मात्र, त्यात अडथळे येत गेल्याने अजूनही हा प्रकल्प रखडत होता. आता ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम सुरू आहे. या प्रकल्पांना निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडला. तर, प्रकल्पांच्या कामांनी मार्च २०२१ पासून वेग धरला आहे. रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास येत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान सुमारे ९ किमी अंतराच्या दोन मार्गिकांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. नुकताच पार पडलेल्या १४ तासांच्या ब्लॉकमध्ये एक नविन डाऊन जलद मार्गिका सुरू केली. या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे. तर, पुढील ब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून 72तासाचा सर्वात मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ब्लॉक 5 , 6 आणि 7 फेब्रुवारी असा असणार आहे. ज्यामध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधील अंतिम टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. त्यानंतर प्रवाशांना ठाणे ते दिवा दरम्यान सहा मार्गिकेवरून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
असा असणार ७२ तासांचा ब्लॉक -
एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वे यांच्यावतीने 4, 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी या कालावधीत 72 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवेच्या मार्गात बदल, अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत. यासह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. परिणामी, प्रवाशांना या ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान, 4 ते 6 फेब्रुवारीच्या ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर सहावी मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका सुरू होणार आहे.
रेल्वेकडून अधिकृत घोषणा नाही -
आज एका मराठी वृत्तवाहिनीने ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान 4,5 आणि 6 फेब्रुवारी रोजी 72 तास जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची वृत्त प्रसिद्ध केले आहे. याचबरोबर या ब्लॉक कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द होणार अशा प्रकारची माहिती सुद्धा प्रकाशित केली आहे याबाबत रेल्वेच्या जनसंपर्क विभागाला विचारली असता त्यांनी सांगितले की याबाबत अधिकृत घोषणा अद्यापही रेल्वेकडून करण्यात आलेली नाही. उद्या आम्ही प्रसिद्धी पत्रक काढून याबाबत माहिती देऊ असं सांगण्यात आले आहे. मात्र या बातमीमुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचा तिकीटांसाठी धावपड सुरु केली आहेत.