मुंबई - राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना आणि वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिली.
भाजपचे सदस्य राजेश राठोड यांनी बंजरा समाजातील तांड्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, सुरेश धस, शिवसेनेचे सदस्य रामदास कदम यांनी राज्यातील धनगर वाड्यांना भेडसावणाऱ्या समस्या परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्या.
महसूली दर्जा देण्याबाबत कार्यवाही सुरू-
औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 5 वाडी, तांड्याना महसुली गावांचा दर्जा देण्याचे प्रस्ताव परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील आगरगाव व येरणगाव या महसुली गावाच्या बाहेर असलेल्या तांड्याना तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेल्हारा व दहेगाव या 300 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. कोकणातील डोंगराळ भागात ज्या धनगरवाड्या आहेत त्यांना सुविधा देण्यासाठी लोकसंख्येचे निकष बदलण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहितीही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
हेही वाचा- माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, ऊसतोड मजुरांच्या व्यथा मी जाणतो, धनंजय मुंडेचे भावनिक उद्गार