मुंबई - 'कार्डीला क्रुझ'वरील पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला व दोन मित्रांना सोडण्यासाठी भाजपकडून एनसीबीला फोन गेला होता. त्यानुसार एनसीबीने तीन जणांना सोडले, असा गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर केला आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा खुलासा करत, एनसीबीच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. ठोस पुराव्या अभावी आम्ही सहा जणांना सोडले असून कारवाई कायदेशीर पद्धतीनेच झाली आहे. एनसीबीच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचा खुलासा शनिवारी (दि. 9 ऑक्टोबर) एनसीबीने केला आहे.
ठोस पुराव्या अभावी सहा लोकांना सोडले - एनसीबी
नवाब मालिक यांचा आरोपानंतर काही तासातच एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. एनसीबी एक निःपक्ष केंद्रीय संस्था आहे. एनसीबीच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहे. एनसीबीला मिळालेल्या सूचनेनुसार, 2 ऑक्टोबर, 2021 रोजी 'कार्डीला द क्रुझ'वर रात्री आम्ही छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 13 जणांना क्रुझवरुन ताब्यात घेतले होते. या सर्व आरोपींना एनसीबी कार्यलयात आणून आम्ही कसून चौकशी केली आणि त्याच्या जबाब नोंदविण्यात आलेला आहे. चौकशीनंतर ताब्यात असलेल्या 14 पैकी 8 जणांना अटक केली आणि ठोस पुराव्या अभावी सहा जणांना सोडून देण्यात आले, अशी माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
आरोपींविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे म्हणाले, आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामुळे न्यायालयानेही आम्हाला या आरोपींची दोन वेळा एनसीबी कोठडी दिली होती. आता न्यायालयानेही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामागचे कारण या आरोपीविरोधात आमच्याकडे ठोस पुरेसे पुरावे आहेत. एनसीबी एक निःपक्ष केंद्रीय संस्था असून समाज, धर्म, जाती, व्यक्ती आणि पक्ष बघून चौकशी करत नाही. पुराव्यानुसार आम्ही ही कारवाई केली आहे, असा दावा एनसीबीने आज आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. एनसीबीच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. माननीय न्यायालय जे आम्हाला सांगणार ते आम्ही करू, असेही वानखेडे यांनी सांगितले.
नवाब मलिकचे आरोप
दोन ऑक्टोबरला एनसीबीकडून कार्डीला क्रुझवर धाड टाकून 11 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या 11 जणांपैकी केवळ एनसीबीने 8 जणांनाच त्यानंतर ताब्यात घेतल्याचे सांगितले. मात्र, ज्या तीन जणांना एनसीबीने सोडले त्यापैकी एक भारतीय युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय याचा मेहुणा रिषभ सचदेव हा होता. तर इतर दोघे प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला हे होते. या तिघांना सोडण्यासाठी त्या रात्री भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली तसेच महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी एनसीबीसोबत संपर्क साधून त्यांना बाहेर काढले. याबाबत आपल्याकडे व्हिडिओ असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केला आहे. तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची एनसीबीने उत्तरे द्यावीत, अशी मागणीही केली आहे.