मुंबई - मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादात अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वझे यांची 12 मार्चला नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. सचिन वझे संदर्भातल्या अनेक घडामोडी आज घडल्या आहेत. सचिन वझे यांचे व्हॉटसअॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी जगापासून निरोप घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे. तसेच वझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे कोर्टाने नकार दिला आहे.
सचिन वझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे कोर्टाचा नकार
संभाव्य अटक टाळण्यासाठी कोर्टात गेलेले वझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. सचिन वझे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नकार दिला. वझे यांच्या अर्जावर आता १९ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात
सचिन वझे यांची एनआयएककडून चौकशी
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मृत्यू प्रकरणी आधी एटीएसकडून आणि आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वझे यांचा आज जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, वझे यांची एनआयएने तब्बल चार तास चौकशी देखील केली आहे.
सचिन वझेंचे स्टेटस व्हायरल
'17 वर्ष संयम ठेवून लढलो. पण यावेळी मला लढण्यासाठी ना वेळ आहे ना संयम आहे. आता जगाला अलविदा करण्याची वेळ आली आहे.' असे सचिन वझेंचे स्टेटस व्हायरल झाले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, मी माहिती घेतो असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा - सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख