मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. मेमनची ही कबर संगमवर दगडाने आणि विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई काढली आहे.
काय आहे प्रकरण : 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे. त्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केल्याची चर्चा आहे. मुस्लिम दफनभूमी ट्रस्टीने विकली आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. कारण मेमन दफन झाल्यानंतर साधी असलेली कबर सजवण्यात आली होती. ओट्याला संगमरवरी दगड बसवण्यात आले आहेत. LED दिवे लावले होते. हे दिवे रात्रीच्यावेळी चालू असतात. मुख्यतः मेमनच्या कबरीवर त्यांचा फोकस असतो. स्मशानभूमी विश्वस्तांकडून कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून वीजपुरवठा केला जात होता. कबरीची जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरीला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
ट्रस्ट म्हणाले सजावट नाही : दुसरीकडे बडा कब्रस्तानचे ट्रस्टी शोएब खातीब यांनी सांगितले अशा प्रकारची काहीही सजावट केलेली नाही. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडिओ किंवा फोटो बडी रातचा जुना असण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टाने असा कुठलाही आदेश दिलेला नाही की कुठली कबर सजवू नका, असेही त्यांनी सांगितले. तसेच याकूब मेमनच्या कबरीस संगमवर लावण्यात आले आहे हे खरे आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा शिवसेनेवर आरोप : दुसरीकडे कालपासून या सजवलेल्या कबरीच्या फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात याकुब मेमनच्या कबरीचं मजारमध्ये रुपांतर करण्यात आलंय. १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबरीचे मझारमध्ये रुपांतर करण्यात आलंय. हेच त्याचं मुंबईवरच प्रेम का? हीच त्यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी, असा हल्लाबोल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
कोण आहे याकूब मेमन : याकूब मेमन हा मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला फासावर चढविण्यात आले होते. फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते.