मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव, भाजपकडून होणारे कथित आरोपांमुळे महाराष्ट्र सरकारमधील वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेने या विरोधात रणशिंग फुंकले असून, केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपला थेट आव्हान दिले आहे. आता तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. सी. राव (Telangana CM K Chandrashekhar Rao) यांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. येत्या 20 फेब्रुवारीला भेटीचा मुहूर्त निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.
- के.सी. राव यांचा शिवसेनेला पाठिंबा -
ईडी, आयटीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांना टार्गेट केले जात आहे. अनेकांनी याबाबत उघडपणे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत, केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजप नेत्यांच्या कथित हितसंबंधात आवाज उठवला. देशभरात या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा सुरू आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. दरम्यान, लवकरच मुंबईत येऊन भेट घेणार असल्याची इच्छा राव यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील भेटीचे निमंत्रण दिले असून, येत्या 20 फेब्रुवारीला दोन्ही नेत्यांची भेटगाठ होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे.
- 20 फेब्रुवारीला भेटीचा मुहूर्त -
केंद्रातील भाजपचे सरकार पूर्वीच्या काँग्रेस सरकारप्रमाणे वागत आहे. राज्याच्या अधिकारांवर गदा आणत आहे. देशासाठी एक नवी राज्यघटना, नवी राजकीय शक्ती, नवीन शासनाची संकल्पना मुख्यमंत्री के. सी. राव यांनी मांडली आहे. तसेच भाजपला मुळापासून उपटून फेकायचा असेल तर क्रांतिकारक एकजूट महत्त्वाची आहे. देशाच्या भवितव्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या चळवळीप्रमाणे देशात एक चळवळ उभी राहायला हवी, अशी भूमिका राव यांनी मांडली आहे. आता महाराष्ट्रात शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे या भेटीत नक्की काय भूमिका घेतली जाईल, याकडे लक्ष लागले आहे.