मुंबई - 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर देशाची दुसरी खासगी रेल्वे असलेली तेजस एक्सप्रेस मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावली. प्रवाशांचा प्रतिसाद तुफान मिळालेल्या पहिल्याच दिवशी तेजस एक्सप्रेसमधून 1600 प्रवाशांनी प्रवास केला. तसेच या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा लग्नाचा वाढदिवस व्हॅलेंटाईन डे निमित्त साजरा केलेला आहे, अशी माहिती इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) देण्यात आलेली आहे.
1 हजार 600 प्रवाशांनी केला प्रवास -
कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी रेल्वे सुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र, आता कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असताना रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने खासगी तेजस एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर मुंबई ते अहमदाबाद धावणारी तेजस एक्सप्रेस सुरू केली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी तेजस एक्सप्रेसमधून 1 हजार 600 प्रवाशांनी प्रवास केला. तर, एका फेरीमध्ये सुमारे 800 प्रवाशांनी प्रवास केला.
एक्सप्रेसमधील प्रवास स्मरणीय -
'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. यासह सण-उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करण्यावर भर दिला जातो. 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करण्याऱ्या दोन जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे या प्रवाशांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. लग्नाचा वाढदिवस आणि तेजस एक्सप्रेसमधील प्रवास कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया तेजस एक्सप्रेसमधील प्रवाशांनी दिली.
अंधेरी येथे विशेष थांबा -
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-अहमदाबाद धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस ला अंधेरी येथे एक विशेष थांबा देण्यात आलेला आहे. हा थांबा 29 मार्चपर्यंत देण्यात येण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्रमांक 82901 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस दुपारी 3.56 वाजता अंधेरी येथे थांबा घेण्यात येईल. तर, दुपारी 3.58 वाजता येथून सुटेल. तर, गाडी क्रमांक 82902 अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्सप्रेस अंधेरी येथे दुपारी 12.28 वाजता थांबा घेऊन दुपारी 12.30 येथून मुंबई सेंट्रलसाठी सुटेल.