मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. कालपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजारी असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या, तरी ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणाला गर्दी पाहायला मिळत आहे. आजही अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. अनेकवेळा अॅप सुरू होऊन बंद होत असल्याने लसीकरणादरम्यान अडचणी येत आहेत.
हेही वाचा - इतिहासात पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर बंद
अॅपमध्ये तांत्रिक अडचणी -
मुंबईत कालपासून म्हणजेच 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजारी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. काल सकाळपासून 3 खासगी रुग्णालय, 4 कोविड सेंटर आणि सेव्हन हिल रुग्णालयात लसीकारणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने काही ठिकाणी सकाळी 11 नंतर तर काही ठिकाणी दुपारी 12 ते साडेबारा नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. घाटकोपर येथील हिंदू महासभा रुग्णालयात तर तब्बल साडे सहा तासानंतर म्हणजेच दुपारी 3.30 नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ज्येष्ठ नागरिक व विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आज दुसऱ्या दिवशीही कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरण उशिरा सुरू झाले. आजपासून महापालिका आणि सरकारी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक व्हील चेअरवर बसून लसीकरणाला अनेक ज्येष्ठ नागरिक आले होते.
हेही वाचा - कोरोनावर भारतीय मसाले गुणकारी, 'या' मसाल्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली मागणी
कालची लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत काल 26 लसीकरण केंद्रांवर 97 बूथवर 4000 आरोग्य कर्मचारी तर 4900 फ्रंट लाईन वर्कर, 45 वर्षावरील आजरी व 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक 1200 अशा एकूण 9700 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दीस्टापेक्षा 78 टक्के म्हणजेच 7 हजार 530 लसीकरण करण्यात आले. त्यातील 4 हजार 880 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 650 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 2 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. कालपर्यंत 2 लाख 5 हजार 13 लाभार्थ्यांना पहिला तर 23 हजार 827 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 28 हजार 840 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांचा उदंड प्रतिसाद -
मुंबईत 4000 आरोग्य कर्मचारी तर 4900 फ्रंट लाईन वर्कर, 45 वर्षावरील आजरी व 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक 1200 लोकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3281 म्हणजेच 82 टक्के आरोग्य कर्मचारी, 2267 म्हणजेच 46 टक्के फ्रंट लाईन वर्कर तर 1982 महजेच 165 टक्के 45 वर्षावरील आजरी व 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक यांचे लसीकरण करण्यात आले.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 1,29,965
फ्रंटलाईन वर्कर - 96,893
45 वर्षावरील आजारी - 260
60 वर्षावरील - 1,722
एकूण - 2,28,840