मुंबई - भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका त्यांच्याच भूमीत 2-1 अशा फरकाने जिंकून इतिहास रचला आहे. मंगळवारी टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये प्रथमच कसोटी सामना जिंकून बोर्डर - गावस्कर ट्रॉफी कायम राखली. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय नोंदवून टीम इंडियाचे काही सदस्य गुरुवारी भारतात परतले. त्यापैकी प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे, प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ मुंबईत दाखल झाले, तर रिषभ पंत दिल्लीत दाखल झाला. यावेळी या खेळाडूंचे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.
विमानतळ सोडल्यानंतर रहाणे मुलुंडमधील आपल्या घरी पोहोचला. तेथे त्याचे पत्नी राधिका व सोसायटीच्या सदस्यांनी जल्लोषात स्वागत केले. रहाणे याच्यासाठी रेड कार्पेट घालण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. येथे रहाणे यांनी पत्नी व मुलीसमवेत एक छायाचित्र काढले आणि त्यानंतर शेजार्यांनी त्यांचे स्वागत केले. रहाणे यांच्या या जोरदार स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.