मुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन (Old Pension Scheme) ते विविध 46 मागण्या या प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी कर्मचारी येत्या 23 आणि 24 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यभर दोन दिवस लाक्षणिक संपावर जाणार (Teachers-Non Teaching staff on Strike) आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याबाबत महाराष्ट्र शासनाला नोटीस दिली आहे.
यामुळे उपसलं संपाचं हत्यार -
राज्यात राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे, सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येत्या 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात राज्यभर राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
काय आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मागण्या
1) एमपीएस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा
2) वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी लावलेले प्रशिक्षण शुल्क रद्द करावे
3) दरमहा वेतन एक तारखेला होण्याची धोरण अमलात आणावा
4) विमान पेन्शन मध्ये केंद्र समान उचित वाढ करा
5) सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत
6) वाहतूक शैक्षणिक घरभाडे केंद्रानुसार मिळावेत
7) शिक्षकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा
राज्यभर आंदोलन -
अशा एकूण 46 मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आता राज्यभर उपोषणाला बसणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य चिटणीस विजय कोंबे आणि राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी पत्रक काढून दिली आहे. त्यामुळे, येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला राज्यातील शिक्षक शिक्षकेतर आणि कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासहित अनेक काम प्रलंबित राहणार आहेत.