मुंबई - दापोलीच्या पणदेरी गावातील धरणाची गळती सुरू झाल्याने शासनाने धरण फुटीकडे लक्ष देण्याचे काम चक्क शिक्षकांना देण्यात आले होते. याबाबतची बातमी फक्त ईटीव्हीने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेऊन शासनाने शिक्षकांना धरणाच्या गळतीकडे लक्ष देण्याचे दिलेले काम रद्द केले आहे. तसे आदेशाचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे.
काय होते आदेश -
दापोलीच्या पणदेरी गावातील धरणाची गळती सुरू झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील परिस्थितीची माहिती प्रशासनाला कळविण्यासाठी याठिकाणी शिक्षकांच्या नेमणूका करण्याचे आदेश दिले होते. तसेच शिक्षकांना नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून धरणाचे सद्यस्थितीचे अहवाल देण्याचे फर्मान मंडणगड आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिले होते. हे कामकाज करताना कोविड १९ बाबतचे सर्व नियम पाळून कामकाज करण्यात यावे. आदेश प्राप्त होताच त्वरित कामकाजास सुरूवात करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय विलंब करणाऱ्या कर्मचारी-अधिकारी यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ३०, ३३, ३४, ४१ व ५१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३, ५३ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे पत्रात नमूद केले होते.
भाजपा शिक्षक आघाडीने केला होता विरोध -
हा आदेश येताच भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी विरोध केला होता. तसेच राज्यात शिक्षकांची अवहेलना होत असल्याचे मत अनिल बोरनारे यांनी ईटीव्ही समोर व्यक्त केले होते. तसेच कोरोनाच्या काळामध्ये कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण करा, चेक पोस्टवर काम करा, विलगीकरण कक्षात काम करा हे ठीक होते. परंतु रेशन दुकानदारांवरील रांग व्यवस्थित करा, दारूच्या दुकानासमोरील रांग व्यवस्थित करा, आता ही कामे कमी होत असताना, दापोलीच्या पणदेरी गावातील धरण आहे. या धरणाला गळती लागलेली आहे. या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे या राज्यांमध्ये शिक्षकांची किती अवहेलना होत आहे, असे मत अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले होते. याबाबतची बातमी फक्त ईटीव्हीने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेऊन शासनाने शिक्षकांना धरणाच्या गळतीकडे लक्ष देण्याचे दिलेले काम रद्द केले आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीतील एक मोठा नेताच ओबीसी आरक्षणात 'झारीतील शुक्राचार्य' - चंद्रशेखर बावनकुळे