मुंबई - कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या सर्वच विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात करावी, अशी नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन, ऑल इंडिया सेटनेट टीचर्स आणि प्रहार विद्यार्थी संघटनांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात अद्याप निर्णय होऊ शकला नाही. दुसरीकडे अजूनही उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबीचा विचार करून सरकारने उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांनी करत यासाठीच्या एका शिष्टमंडळाने मंत्री उदय सामंत याची भेट घेऊन केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांची भेट घेऊन आज प्रहार विद्यार्थी संघटना व नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि ऑल इंडिया सेटनेट टीचर्स संघटनेच्या वतीने मागणी केली असून कोरोनाच्या धर्तीवर 25 टक्के अभ्यासक्रम कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल.
राज्यातील सर्व विद्यापीठात प्रथम वर्षाचे प्रवेशही यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उशिराने होत आहेत आणि अजूनही प्रत्यक्षात महाविद्यालयातील शिक्षण सुरू झाले नाही. काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षण चालू असले तरी वर्ष भराचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही म्हणून शालेय शिक्षण विभागाप्रमाणे आपणही 25 टक्के अभ्यासक्रम कमी करावा, यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनाही दिलासा मिळेल, असे या संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात प्रहार विद्यार्थी संघटनेचे अॅड.मनोज टेकाडे, अॅड.अजय तापकीर, नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन संघटनेचे प्रा. कुशल मुडे, प्रा.भुपेश मुडे यांचा समावेश होता.: