मुंबई - मागील महिन्याभरापासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे. शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. सरकारचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे 35 दिवस आंदोलन करून सरकार लक्ष देत नसल्याने शिक्षकांनी आज( बुधवार) मोहरमच्या दुसऱ्याच दिवशी आझाद मैदानावर मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांचा मातम करत आपला संतप्त व्यक्त केला आहे.
शिक्षक आमदारांचे विधान भवनाच्या आवारात ठिय्या आंदोलन व गेल्या आठवड्यातील नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शासनाने या शाळांसाठी 20 टक्के अनुदानाची घोषणा केली. त्याचप्रमाणे ज्या शाळांना अनुदान मिळत आहे, त्यांच्या अनुदानात 20 टक्के वाढ करून ते 40 टक्के करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर शिक्षकांचे आंदोलन सुरू राहिले आहे. कारण जो निर्णय आहे तो शिक्षकाना मान्य नाही. त्यामुळे सरकार लक्ष देत नाही, असा आरोप शिक्षकांनी करत आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारचा मातम शिक्षकांनी केला.
19 सप्टेंबर 2016 चा निर्णय रद्द करून 20 टक्के अनुदान घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे ही शिक्षकांची मुख्य मागणी आहे. तसेच 20 टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळावे आणि सर्व अघोषित शाळा निधीसह घोषित कराव्यात अशा मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आणि जर सरकारने लक्षच दिले नाही, तर तोंडात मारून न्याय घेणार असे विनाअनुदानित शिक्षकानी सांगितले आहे.