मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतने म्हणजेच तन्मय फडणवीसने कोरोनाची लस घेतल्याने लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील लोकांना लस मिळत होती. मात्र तन्मय फडणवीस हा 45 वर्षाचा नसतानाही त्याला लस कशी काय देण्यात आली?, असा सवाल उपस्थित केला जात होता. ही माहिती आरटीआय (RTI) कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहितीच्या आधिकाराद्वारे समोर आणली आहे.
उत्तर आता आले समोर
सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मय फडणवीस याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. पहिल्या डोसनंतर मिळालेले प्रमाणपत्र दाखवून नागपूरमध्ये त्याने दुसरा डोस घेतला होता. मात्र, त्याला पहिला डोस कशाच्या आधारावर देण्यात आला? असा सवाल माहिती अधिकारातून उपस्थित करण्यात येत होता. त्याचे उत्तर आता समोर आले आहे. तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची माहिती दिली गेली आहे.
नेमकी कोणत्या आधारावर घेतली लस?
बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत याबद्दलची माहिती मिळवली आहे. तन्मय फडणवीसच्या ट्विटर अकाउंटवर अॅक्टर अशी प्रोफाईल माहिती लिहिलेली असतांना त्याला आरोग्य कर्मचारी म्हणून लस कशी मिळाली?, असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. तन्मय हे फडणवीसांचे पुतणे आहेत म्हणून त्यांना लस दिली?, अभिनेते आहेत म्हणून त्यांना लस दिली?, आरोग्य सेवक आहेत म्हणून लस दिली?, किंवा त्यांनी खोटे आरोग्य सेवकाचे प्रमाणपत्र सादर करून लस घेतली?, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - सुशांतच्या जीवनावर चित्रपट बनवण्याला वडिलांचा विरोध, दिल्ली न्यायालयाने याचिका फेटाळली