मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशी छेडछाड करत त्याजागी टिपू सुलतानचा चेहरा लावून छायाचित्र ट्विट करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा गटनेता प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भातील तक्रार आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
'हे कृत्य शिवाजी महाराजांचा अपमान करणारे' -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ फोटोशी छेडछाड करून त्याजागी टिपू सुलतानचा चेहरा लाऊन ते छायाचित्र भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले. त्यांचे हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आणि तमाम हिंदूंच्या भावना दुखावणारे असून यातून काँग्रेसच्या हिणकस प्रवृत्तीचे दर्शन होते. या घृणास्पद कृत्याचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
'ही घटना अतिशय गंभीर' -
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता असून संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. श्रीनिवास यांनी शिवरायांच्या फोटोशी छेडछाड करून हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपूचा फोटो लावणे ही घटना अतिशय गंभीर असून यातून हिंदू द्वेषाची स्पष्टता होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही. याबद्दल तातडीने पोलीस प्रशासनाने श्रीनिवास यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा आमदार मिहीर कोटेचा यांनी दिला.
हेही वाचा - 'चौकीदारही...' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा