मुंबई - राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात एक टॅक्सी ड्रायव्हरने गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत सुळे यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला असून, थेट रेल्वे मंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. तसेच सुळे यांनी याबाबत संबंधित टॅक्सी ड्रायव्हरच्या विरोधात रेल्वे पोलिसांकडेही तक्रार केली आहे. रेल्वे मधून प्रवास करणाऱ्या वर प्रवाश्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी या ट्विटमधून केली आहे.
सुप्रिया सुळे औरंगाबादहून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईत परतल्या होत्या. यावेळी दादर स्थानकावर उतरल्यानंतर एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांच्याशी गैरवर्तन केले. टॅक्सी ड्रायव्हर ने गैरवर्तन करत सुळे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता.
‘दादर रेल्वे स्थानकावर विचित्र अनुभव आला'. कुलजीत सिंह मल्होत्रा असं स्वतःचं नाव सांगणारा माणूस ट्रेनमध्ये शिरला. टॅक्सी सेवेसाठी तो दलाली करत होता. दोन वेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता आडवला. इतकंच नाही, तर निर्लज्जपणे माझ्यासोबत सेल्फी काढण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 'केवळ नेमलेल्या टॅक्सी स्टँडवरच एजंट्सला संमती द्यावी'; रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा बोगीत हे टॉक्सिवाले कशी काय दलाली करतात, असा सवालही त्यांनी केला आहे.
स्थानकावरील पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित एजंटला पकडून दंड वसूल केला. संबंधित घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासन व दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, या तत्काळ कारवाईसाठी त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.