मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधाऱ्यांवर आरोपांची खैरात करत भाजपने जेरीस आणले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक अपवाद वगळता एकाही नेत्याने भाजपच्या आरोपांना ठोसपणे आव्हान दिलेले नाही. महाविकास आघाडीची प्रतिमा यामुळे मलीन होत असल्याने, आता आघाडीतील नेते काऊंटर अटॅकच्या तयारीला लागल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजप-शिवसेना वाद शिगेला
राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे. भाजपने मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेशी युती तोडली. त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिड दिवसांचा घरोबा चांगलाच गाजला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेनास, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी स्थापन सरकार स्थापन केले. दरम्यान, हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यासह अन्य नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर घोटाळ्याचे कथित आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी लावण्यात आल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सध्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. उर्वरित १० जण चौकशीच्या फेऱ्यात आहेत.
नवाब मलिक आणि एनसीबी
कार्डलिया क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टीत अभिनेता शाहरुख खानच्या मुलासह सात जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या या कारवाईवर सुरुवातीपासूनच संशय घेतला. कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारमाध्यमात प्रसिद्ध कायदे वानखेडे यांची नियुक्तीही संशयास्पद असल्याचा आरोप मलिक यांनी करत केंद्र सरकारच्या यंत्रणांनी जोरदार धक्का दिला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ही नावे उघड केल्याने, भाजप नेत्यांची तोंड बंद झाली. एनसीबीने वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीला बोलावून घेतले. पुढे हा वाद आता चांगलाच पेटला. मलिक यांनी वानखेडे यांच्या कारवाईवर पुन्हा आक्षेप घेत धारेवर धरले आहे. वानखेडे यांच्याकडून ही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी मलिक यांनी एकाकी लावून धरलेली बाजू महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडत आहे.
संजय राऊत आणि भाजपा
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणा संजय राऊत यांनी आपल्या धारदार शैलीतून जोरदार फटकारे मारत आहेत. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. यावरून संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही घाबरत नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असे सांगत बायकांच्या पदराआड लपून भाजपने कारवाया करणे थांबवावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला होता. भाजपने सुडाचे राजकारण करणे थांबवावे. अन्यथा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. आजही भाजप विरोधात शिवसेनेकडून संजय राऊत वन मॅन शो किल्ला लढवत आहेत. मात्र, राऊत यांच्यापुढे भाजपचे शेर ढेर होतानाचे चित्र दिसत आहे.
ज्यांचे पारडे जड
भाजप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना जेरीस आणण्यासाठी चंग-चंग पछाडत आहे. महाविकास आघाडी सरकारची जनमानसात बदनामी कशी करता येईल, यावर भाजपचा भर आहे. आघाडी सरकारने ही बाब विचारात घेत, आता काऊंटर अटॅक करण्यास सुरुवात करायला हवी. आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप विरोधात सरकारने भक्कम पुरावे जमवून न्यायालयात लढा द्यावा. जेणेकरुन आघाडी सरकारच्या प्रत्येक उत्तराने भाजपला लगाम बसून आरोपांची मालिका खंडित होण्यास वाव मिळेल. आघाडी सरकारने जनमानसातील प्रचलित चेहऱ्यांना यासाठी संधी द्यायला हवी. तसेच निवडणुक, सभांप्रमाणे केवळ आरोप न करता भाजपच्या करनाम्यांची वस्तुस्थिती कागदपत्रांसहित सर्वांसमोर आणायला हवी. न्यायालयात ज्यांचे पारडे जड असेल, असे राजकिय विश्लेषक अजय वैद्य यांनी सांगितले.
अजित पवार, हसन मुश्रीफ यांनी बाह्या सरसावल्या
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे नातेवाईक ही अशाच आरोपांचे शिकार बनले आहेत. मात्र, आता किरीट सोमय्या यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अजित पवार आणि मुश्रीफ यांनी कागदपत्रांची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्या आक्रमकतेनंतर कथित आरोप असलेल्या मंत्र्यांनी बाह्या सरसावल्या सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपचे आता चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग दुर्घटना : सहा जणांवर कारवाई - आरोग्यमंत्र्यांची ट्विट करत माहिती