मुंबई - 2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह हिचा पोलीस कोठडीत असताना छळ करण्यात आल्याचा आरोप झाला होता. 2018 मध्ये वकील आदित्य मिश्रा यांच्याकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारी संदर्भातील सुनावणी महाराष्ट्र महिला आयोगाकडे वर्ग करण्यात आली होती. यानुसार महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना यासंदर्भात समन्स देण्यात आला आहे. 6 एप्रिल रोजी राज्य महिला आयोगाकडे यासंदर्भात हजर राहण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
साध्वी प्रज्ञासिंह हिला मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात 2017 मध्ये जामीन मिळालेला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून साध्वी प्रज्ञासिंहला क्लीन चिट जरी मिळालेली असली तरी तिच्यावरचा खटला हा अद्यापही सुरू आहे . मालेगाव बॉम्ब ब्लास्टमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. 2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्टसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल ही साध्वी प्रज्ञासिंहच्या नावावर असल्याचेही सांगितले जात आहे.