मुंबई - तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व जिल्ह्यांच्या पाहणीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच या वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मत्स्य व बंदर विकास मंत्री असलम शेख यांनी दिले आहेत. असलम शेख उद्यापासून नुकसानग्रस्त विभागाची पाहणी दौरा सुरू करणार आहेत. उद्या पालघर मधील मच्छीमारांचे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.
त्यानंतर कोकण किनारपट्टी भागात कोळी बांधवाचे तसेच इतर नागरिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी देखील अस्लम शेख यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच संबंधित खात्याचे सर्व मंत्री नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील असे देखील यावेळी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिथे नुकसान झाले तिथे पंचनामे सुरू आहेत, किती नुकसान झाले याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सरकारने या आधीही निकष बाजूला ठेऊन अधिक मदत केली आहे. त्यानुसार शेतकरी, मच्छिमार यांना आताही सरकारकडून मदत केली जाईल असे ही अस्लम शेख यांनी सांगितले.