मुंबई : महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्यास परवानगी दिली. मात्र धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याने भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे. हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना चिंता अधिक भेडसावतेय अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
राज्य सरकार गोंधळलेले
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील केले. गणेशोत्सव तोंडावर आल्याने काही निर्बंधही घातले आहेत. राज्यातील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांबाबत कोणतेही निर्णय घेतलेले नाही. राज्यात सर्व गोष्टी सुरू होत असताना केवळ मंदिरे आणि धार्मिक स्थळेच बंद का? असा सवाल विरोधी पक्ष भाजपकडून विचारला जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची टीकाही भाजपने केली आहे.
मंत्रालयाचे मदिरालय झाले की काय?
आज देव दैवत कड्या-कुलुपात आहेत. एका बाजूला रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप चालू करत आहेत. डान्सबारमधील गर्दीत थय्या थय्या सुरु आहे. मंत्रालयात नुकताच बाटल्यांचा खच सापडला. मदिरेची जेवढी काळजी घेतली जात आहे त्यावरून मंत्रालयाचे मदिरालय झाले आहे की काय? असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. राज्य सरकारची मंदिराबाबत भूमिका स्पष्ट नाही. सरकारला हिंदुत्वाच्या बाबतीत देणे-घेणे नाही. देव-दैवतांच्या संदर्भात सुद्धा काही पडलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत लोकांना दैवतांच्या पायाशी मनःशांती मिळते. अनेक परंपरागत व्यवसाय आहेत. पुजारी, नारळ वाले, हार वाले आदींवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने याचा सर्वार्थाने विचार घेऊन मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यायला हवा. भाजपने अनेक आंदोलने केली. परंतु, सरकारला पाझर फुटत नाही. सरकार मंदिरं उघडायला तयार नाही असेही देरकर म्हणाले.
केंद्राच्या विरोधात रस्त्यावर या-महापौर
केवळ मंदिरंच बंद नसून बऱ्याच गोष्टी बंद ठेवल्या आहेत. आज डेल्टा प्लसचे दोन रुग्ण सापडले आहेत. विषाची परिक्षा खूप मोठ्या प्रमाणात घ्यायची का? मंदिरे बंद ठेवण्यात मजा वाटत नाही. आपण कर्मण्यवादी रहायला हवे असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मंदिरे उघडलीच पाहिजेत. प्रत्येक धर्माच्या स्थळांमध्ये भक्तीभाव आहे. शिवाय, आंतरिक समाधान मिळते. परंतु, अशा परिस्थिती विरोधकांचा अट्टहास का, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला. कोरोनाची दुसरी लाट आली, त्यावेळी कोणीही जबाबदारी घ्यायला पुढे आले नाही. रुग्णसंख्या कमी झाल्यावर विरोधक जागे झाले आहेत. सरकारला नीट काम करु द्या. उगाच विरोधात आहात म्हणून विरोध करु नका. विरोधक काय म्हणातात, त्यापेक्षा महाराष्ट्रात एंकदरीत वातावरण काय तयार झाले आहे. मुख्यमंत्री हळूवारपणे पाऊले टाकत आहेत. राजकारण करण्यापेक्षा पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होत नाही. भाजपने त्यासाठी केंद्राकडे मागणी करावी. राज्याला बारा कोटी लसींची आवश्यकता आहे. मुबलक लसींचा पुरवठा झाल्यास तीन महिन्यांत सगळे व्यवहार सुरु करु, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या. तसेच भाजपने केंद्राच्या विरोधात रस्त्यावर यावे, असा सल्लाही महापौरांनी दिला.
साई मंदिर उघडण्यासाठी आंदोलन
गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. त्यामुळे शिर्डीतील हॉटेल, रेस्टॉरंट, हार-प्रसाद विक्रेते, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, शेतकरी, चहा-नाष्टा विक्रेते व इतर हातावर उपजिविका असणार्या प्रत्येकाला अतिशय गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागत असल्याचे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी म्हटले आहे. यामुळे नागरिकांचा संयम सुटत आहे. समन्वय नसलेल्या महाविकास आघाडी सरकारचे फक्त वसुलीकडेच लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देश-विदेशातील साईभक्तांच्या भावना पायदळी तुडवत असल्याचा आरोप करत मंदिरे उघडा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी दिला होता.
हेही वाचा - ट्विटरने आपली ब्लॉक पॉलिसी जाहीर करावी, नवाब मलिकांची मागणी