मुंबई - उत्तराखंडला निघालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान प्रवास नाकारल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकाराकडून याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद सुरू आहेत. राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीलाही राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारमध्ये यावरून धुसफूस सुरू असतानाच आता विमानप्रवास नाकारल्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
पुन्हा वाद होण्याची शक्यता -
उत्तराखंडला हिमकडा कोसळून आलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी निघाले होते. माजी मुख्यमंत्री म्हणून ते उत्तराखंडला निघाले होते. त्याकरिता ते सकाळी विमानात बसले. मात्र, राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधण्यात आला. परंतु, कोणतेही उत्तर न मिळाल्याने राज्यपालांना विमानातून उतरुन परत माघारी राजभवनावर परतावे लागले. त्यामुळे आता सरकार आणि राज्यपालांमध्ये शीतयुद्ध रंगणार आहे.
खासगी विमानाने रवाना -
राज्य सरकारने विमान नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले आहे. ते येथे हिमकडा दुर्घटनास्थळाला भेट देणार आहे. राज्यपाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत डेहरादूनला पोहोचणार आहे.
राज्य सरकारला दिली होती पूर्वकल्पना -
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उत्तराखंड दौऱ्याची राज्य सरकारला पूर्वकल्पना दिली होती. तरीही राज्य सरकारने राज्यपालांना विमान प्रवास नाकारल्यानंतर राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्य सरकारला राज्यपालांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे. देहराडूनमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भूषवणार आहेत. शुक्रवारी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी ११ फेब्रुवारीरोजी सकाळी १० वाजता रवाना होणार होते. या संदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सरकारी विमान प्रवासाला परवानगी मिळावी, याकरिता २ फेब्रुवारीरोजी पत्रव्यवहार केला होता. पत्रानुसार राज्यपालांनी गुरुवारी विमानतळ गाठले. मात्र, सरकारी विमान प्रवासास परवानगीच नसल्याची बाब समोर आली.
याबाबत मला याबद्दल माहिती नाही - अजित पवार
राज्यपालांच्या या प्रवासाला राज्य सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आल्यानंतर विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावे लागले. आता ते खाजगी विमानाने उत्तराखंडला जाणार आहे. या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मला याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी असून असा प्रकार महाराष्ट्रात कधी घडलेला नाही. राज्यपाल हा व्यक्ती नाही, तर हे पद आहे. व्यक्ती येतात जातात. खर म्हणजे राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. या प्रकरणात जाणीवपूर्वक राज्यपालांना विमानात बसेपर्यत परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपालांना विमानात बसल्यानंतर उतरावे लागले. हा पोरखेळ आहे, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाल्याचेही त्यांनी म्हटले.
जनता सरकारचा घमंड उतरवेल - आशिष शेलार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास करायला महाविकास आघाडी सरकारने परवानगी नाकारल्याने विमानात बसलेल्या राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाआघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांना सरकारने विमानातून उतरवले, महाराष्ट्रातील जनता महाआघाडी सरकारचा घमंड उतरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
हा सूड भावनेचा अतिरेक - प्रवीण दरेकर
राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग सिंह कोश्यारी यांना विमानप्रवास नाकारल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सूड भावनेचा अतिरेक झाला असून राज्यपालांना जर विमानात बसू दिले जात नसेल, तर हा संविधानाचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतची माहिती नसेल, असे वाटत नाही, असा टोलादेखील त्यांनी अजित पवारांना लगावला.
हे सर्वसामान्य जनता पाहत आहे - चंद्रकांत पाटील
राज्यपालांना विमाना नाकारणे हे अत्यंत शुद्ध मनाचा छोट्या मनाचा कद्रू मनाचा लक्षण आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच राज्यपालांना खाजगी विमानाने कार्यक्रमाला जावे लागले, हे अत्यंत दुर्देवी असून हे सर्वसामान्य जनता पाहत आहे, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यपाल आहेत की भाजपचे प्रवक्ते - बच्चू कडू
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमानात बसूनही परवानगी न मिळाल्याने विमानातून खाली उतरावे लागले. जे घडले त्यासाठी तांत्रिक कारण असेल. पण त्यांची वागणूक पाहता ते राज्यपाल आहेत की भाजपचे प्रवक्ते, हे कळत नव्हते, असा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. तसेच यामुळे राज्यपाल पदाची गरिमा कमी होत असून या पदाची गरिमा गमावू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप -
राज्यपालांना विमान न दिल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारची ही सर्वात मोठे अपयश असल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने द्वेष भावनेतून हा निर्णय घेतला असून कोणत्याही राज्याच्या राज्यपालांना विमान सेवा देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही. राज्याचे प्रथम नागरिक असल्याने तो त्यांचा अधिकार आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी हा विषय गंभीर आहे. यावर चर्चा केली जाईल. राज्यपालांना विमान सेवा देण्यापासून का रोखले, याची चौकशीही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
काय असते प्रक्रिया -
राज्यपालांना कोणत्याही दौऱ्यावर जाण्यासाठी विमान हवे असेल तर त्यांना महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र विमान प्राधिकरण राज्यपालांच्या दौऱ्यांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयला देते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय त्यानुसार मान्यता देतात.
विधानपरिषदेच्या १२ जागेवरूनही सुरू आहे वाद -
विधानसभेचे अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरु होत आहे. अवघ्या १५ दिवसांचा अवधी असतानाही अद्याप १२ राज्यपालनियुक्त सदस्यांना मंजुरी दिलेली नाही. महाविकास आघाडीने याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आता विमानप्रवासाच्या नव्या वादाने ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधील दरी रुंदावण्याची शक्यता आहे.
मंदिरे उघडण्यावरूनही झाला होता वाद -
राज्यात लॉकडाउन असताना राज्यातील मंदिरे उघडण्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या वाद झाला होता. राज्यातील मंदिरे बंद असण्याच्या मुद्यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर, हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करत टीका केली होती. तुम्हीही धर्मनिरपेक्ष झालात का अशी विचारणा करत, एकीकडे सरकार बार, रेस्टारंट खुले करत आहे. पण देवीदेवतांची मंदिरे अजून ही बंद आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. हे सार्वजनिकरित्या मान्य करता. अयोध्येला आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजाही केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही कोरोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात कोश्यारी यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती.
हेही वाचा - कोरेगाव भीमा हिंसाचार: रोना विल्सनच्या लॅपटॉपबाबत करण्यात आला 'हा' दावा