मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजपकडून संजय कणेकर व काँग्रेसकडून प्रज्ञा सातव (pradnya satav) यांना उमेदवारी दिली गेली आहे. परंतु, ही निवडणूक शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होत असल्याने ती बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
हेही वाचा - पॉड हॉटेलपेक्षा रेल्वेची डोरमेटरी रूम बरी! दर कमी करण्याची होतेय मागणी
प्रज्ञा सातव या काँग्रेसचे नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी (rajeev satav wife)
काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी (Maharashtra Legislative Council bypolls) २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी भाजपकडून संजय कणेकर व काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे नेते व माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी असून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस ने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती, तेव्हासुद्धा भाजपने त्यांचा उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली होती. त्या प्रमाणे आतासुद्धा भाजपने संजय कणेकर (bjp Sanjay Kanekar) यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा व निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली.
वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेणार
एखाद्या वर्तमान आमदार किंवा खासदार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महाराष्ट्राची आतापर्यंतची बहुतेकदा परंपरा राहिलेली आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सुद्धा निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून, नाना पटोले यांनी देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीसुद्धा त्यांनी अशा पद्धतीने भेट घेऊन विनंती केली होती. याबाबत सध्या तरी कुठलीही प्रतिक्रिया देवेंद्र फडवणीस यांनी दिलेली नाही. वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणीस यांनी नाना पटोले यांना सांगितले. परंतु, या निवडणुकी संदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी नेहमी अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेता येत नाही, असे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने आता देवेंद्र फडणवीस कुठला निर्णय घेतात, ते बघावे लागणार आहे.
सागर बंगला राजकीय आखाडा झाला होता
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची आज एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने विरोधी पक्ष नेत्यांचा सागर बंगला राजकीय आखाडा झाला होता.
एसटी कामगारांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे उपस्थित केले
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवस्थानी भेट घेतली. राज्यात एसटी कामगारांचा (st workers strike) मुद्दा ज्वलंत झालेला आहे आणि या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अनिल परब देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. कालच एसटी मध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या २२९६ कंत्राटी कामगारांना २४ तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश राज्य एसटी महामंडळाकडून (msrtc) देण्यात आले होते. जर हे कामगार २४ तासांमध्ये हजर झाले नाही तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. म्हणूनच या विषयी चर्चा करण्यासाठी अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा कमिटीसमोर आहे. ज्या काही चर्चा करायच्या आहेत त्या चर्चेला आम्ही तयार आहोत. संप मिटवण्यासाठी शासनाची पूर्ण तयारी आहे. आज अनौपचारिक चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. त्याचाही विचार करून सर्वांचे मत घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून संप मिटवण्यासाठी प्रयत्न करू, असे अनिल परब यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाबाबत काही चर्चा झाली नाही. कारण या संदर्भामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल, त्यामध्ये चर्चा होईल, असेही अनिल परब म्हणाले.
बाळासाहेब थोरातही देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी
महसूलमंत्री थोरात हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले होते. काँग्रेस आमदार नेते शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आजच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. परंतु, या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक निर्णय झालेला नसल्याचे समजल्याने त्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटले. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार संजय कणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, ही विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली. आता तो त्यांचा प्रश्न असून ते याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असेही थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा - ...तर फरार घोषित झालेल्या परमबीर सिंग यांची कोट्यवधींची मालमत्ता होणार जप्त