मुंबई - गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Agitation) राज्यभर सुरू आहे. अजून देखील या आंदोलनाचा तिढा सुटलेला नाही. आज एसटी कर्मचाऱयांच्या एका शिष्टमंडळाने मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे(MNS President Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आला. या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देऊ व लवकरच राज्य सरकारसोबत याबाबत बोलू, फक्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
हेही वाचा - एसटीचा पर्यटकांना फटका, जादा पैसे देऊन करावा लागतोय बैलगाडीने प्रवास
- सरकारसोबत बोलणार - राज ठाकरे
गेल्या 12 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात जवळपास 28 संघटना सामील झाल्या आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी प्रमुख मागणी या एसटी कर्मचाऱ्यांची आहे. या विषयावर लवकरच राज ठाकरे सरकारशी बोलणार आहेत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
- एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा -
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यापासूनच मनसेचे वकील संपाच्या बाजूने लढत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मनसे सहभागी आहे. कायदेशीर लढाई मनसे लढत राहणार असून, राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या आहेत. सुरुवातीला २८ संघटनांनी मिळून हा संप जाहीर केला. परंतु आता सगळ्या संघटना बाजुला ठेऊन स्वत: कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. मनसे कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठाम असून, या विषयावर राज ठाकरे जातीने लक्ष घालणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
हेही वाचा - ST Employees Protest : अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथे एस.टी. कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन