मुंबई - राज्यात उद्यापासून सुरू होत असलेल्या जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करता येईल. मात्र या सर्वच बस नियमित असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच्या वेळेमध्ये प्रवास करावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाकडून आज करण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई,अलिबाग, पुणे या ठिकाणी एसटीच्या नियमित बस फेऱ्या सुरू आहेत. या बसमधून वेळेत विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे. आंतरजिल्हा एसटीची वाहतूक सुरू झाल्याने दूरवर सेंटर आलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे दरम्यान एसटीने प्रवास करता येईल.
नॅशनल डिफेन्स अकादमीची 5 सप्टेंबरला नागपूर येथे परीक्षा होणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
जेईईसाठी राज्यभरात सुमारे 8.58 लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी मुंबई आणि नवी मुंबईतील 20 हजार 256 आणि ठाण्यातील 7191 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.